सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुणे ग्रामीण पोलिस ‘त्या’ शंभर कुटुंबांना रोजगार मिळवून देत त्यांना अवैध दारू निर्मिती तसेच विक्रीच्या दलदलीतून बाहेर काढणार आहेत. अवैध दारू निर्मिती आणि विक्रीवर केवळ गुन्हे दाखल न करता त्यामागील सामाजिक व आर्थिक कारणांवर उपाय करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. अवैध दारू निर्मिती हा पारंपरिक व्यवसाय बनलेल्या कुटुंबांचे समुपदेशन करून त्यांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असून, या कुटुंबांतील मुलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन नोकरीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कंपनीमध्ये रोजगार, विविध वस्तू निर्मितीचे प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची (एनजीओ) मदत घेतली जाणार आहे.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिसमहानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या महत्वाकांक्षी ‘मिशन परिवर्तन’च्या माध्यमातून पुणे ग्रामीण पोलिसांच्या या उपक्रमाची माहिती दिली. दारूबंदी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांतील सराईत आरोपींच्या समुपदेशनासाठी ग्रामीण पोलिस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, उपअधीक्षक शुभम कुमार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
यवत तसेच उरुळी कांचन परिसरात अवैध दारू प्राशनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर अवैध दारू निर्मिती आणि विक्री हा मोठा चर्चेचा विषय झाला. वारंवार पोलिस कारवाईनंतर देखील निर्मिती आणि विक्री सुरूच राहते. प्रत्येक शहरात अशी काही कुटूंबच असून, त्यांचा मुख्य व्यवसायच दारू निर्मिती व विक्री असल्याचे देखील पोलिसांच्या कारवाईतून समोर आलेले आहे. पोलिसांकडून एमपीडीए, तडीपार तसेच मकोका यासारखी कारवाई केल्यानंतर देखील हे प्रकार सरास सुरू राहतात. त्यामुळे पोलिसांकडून कायदेशीर कारवाईसोबतच अशा संबंधित कुटुंबांना या व्यवसायातून बाहेर काढण्यासाठी पुनर्वसनाचा मार्ग स्वीकारला आहे.
शंभर कुटूंबाना देणार रोजगार
यवत तसेच ऊरळी कांचन भागातील अशा जवळपास १०० कुटूबांना यामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यातील ५० कुटूंब सहभागी झाले आहेत. कारवाईसोबत पुनर्वसनावर भर दिला आहे. अवैध दारू निर्मितीविरोधात कारवाई केल्यानंतर संबंधित प्रकार सुरू राहत असेल, तर त्यामागची कारणे समजून घेणे गरजेचे आहे. संबंधित कुटुंबांचे समुपदेशन करून त्यांना पर्यायी व्यवसाय आणि रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या व्यक्तींना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहातआणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
दारू बनविणाऱ्या कुटुंबांतील मुलांना विशेष कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कंपनीमध्ये नोकरी मिळवून देण्याबरोबरच विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराची दारेही खुली केली जाणार आहेत. त्यामुळे पुढील पिढीने अवैध व्यवसायाकडे वळू नये, यासाठी हा उपक्रममहत्त्वाचा ठरणार आहे. – रंजनकुमार शर्मा, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र.
ड्रग्स ते सायबर गुन्हे; पाच विषयांवर जनजागृती
पुणे ग्रामीण पोलिसांकडून ड्रग्स, दारू, वाहतूक नियमांचे उल्लंघन, महिला अत्याचार आणि सायबर गुन्हे या पाच संवेदनशील विषयांवर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत शाळा, महाविद्यालये आणि विविध ठिकाणी पोलिस अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थी आणि नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. पहिल्या टप्प्यात १५ दिवसांचा हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्यानंतर विविध शासकीय विभाग, संस्था, शाळा-महाविद्यालयेआणि स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन व्यापक जनजागृती कार्यक्रम राबविला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात सुमारे ५०० शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे नियोजन आहे.






