सौजन्य : iStock
नागपूर : तस्करांसाठी रेल्वे हा सर्वात सुलभ पर्याय ठरला आहे. त्यातही सापडले जाण्याची जोखीम कमी करण्यासाठी नवनवीन क्लुप्त्या शोधून काढल्या जात आहेत. अगदी अल्पवयीन मुलांच्या मदतीने तस्करी करवून घेतली जात आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या सजग जवानांनी अशाप्रकारच्या गांजा तस्करीचा पर्दाफाश करत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गांजा भरलेल्या तब्बल 4 बॅग होत्या. त्याच्याकडून सुमारे 5,04,000 रुपये किमतीचा एकूण 33 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : जुहू चौपाटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः केली स्वच्छता; समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याचे आवाहन
ताब्यातील मुलगा ओडिशातील रहिवासी आहे. माल सापडले जाण्याची जोखीम कमी व्हावी यादृष्टीने तस्करींनी त्याला पैशांचे आमिष दाखवून ही खेप पोहोचवून देण्यास सांगितली होती. त्याच्या येण्या-जाण्यासह अन्य खर्चही तस्करच करणार होता. तो 20813 पुरी-जोधपूर एक्स्प्रेसच्या बी-5 कोचमधून प्रवास करत होता. त्याच्याकडे वेगवेगळ्या 4 बॅग होत्या. ही गाडी नागपूर स्थानकाच्या फलाट क्रमांक 6 वर येऊन थांबताच आरपीएफ जवान नियमित तपासणीसाठी आत शिरले. बी 5 कोचमध्ये तपासणी करत असताना बर्थ क्रमांक 49 ते 56 दरम्यानच्या कप्प्यात गांजासारखा तीव्र दर्प येत होता.
यामुळे जवानांना शंका आली. त्यांनी तिथे असणाऱ्या मुलाला विचारणा केली आसता त्याने अगदी सहजपणे त्याच्याकडे असलेल्या बॅगेमध्ये गांजा असल्याचे सांगितले. गाडी सुटण्याची वेळ होत असल्याने चारही बॅगांसह मुलाला खाली उतरवून घेण्यात आले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. चारही बॅगमध्ये गांजा आढळून आला.
हेदेखील वाचा : धारावीत तणावपूर्ण स्थिती! मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद, बीएमसी पथकाला रोखलं, जमाव रस्त्यावर