मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत पेल्हार-रशीद कंपाऊंडमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे,चाळी,कारखाने आहेत.अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा आव आणणाऱ्या महापालिकेने या बांधकामांकडे दुर्लक्ष केलं. पालिकेचा हा निष्काळजीपणाआता चांगलाच भोवला आहे. दुर्लक्षित झालेल्या या भागात दारुचे आणि अंमली पदार्थांचे अड्डे अशी गुन्हेगारी प्रवृती वाढणाऱ्या घटना या रशीद कंपाऊंड मध्ये फोफावले आहेत.या परिसराजवळ पेल्हार पोलीस ठाणे आणि पेल्हार पोलीस चौकीही आहे.मात्र,पोलीस आणि पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही.मात्र,या परिसरात सुरु असलेल्या एमडी हा अंमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्याचा सुगावा मुंबई पोलीसांना लागला. त्यानंतर पोलीसांनी धाड टाकून कारखान्यातून अमली पदार्थासह १४ कोटींचा माल जप्त केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार मुंबई-टिळकनगर पोलीस ठाण्यातील झोन क्र.६ चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी ही कारवाई केली.भावी पिढी बरबाद करणारे ड्रग्स चे रॅकेट उध्वस्त करण्याचे काम मुंबई पोलीसांनी हाती घेतले आहे.त्यानुसार कुर्ला येथून एका ड्रग्स पेडलर अटक करण्यात आली.त्यावेळी मुंबई- अहमदाबाद महामार्गालगत पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ड्रग्स सप्लाय केले जाते आणि त्या ठिकाणीच ते तयार केले जात असल्याची माहिती त्याच्याकडून पोलीसांना मिळाली.या माहितीच्या आधारे उपायुक्त शेख यांच्या नेतृत्वाखाली रशीद कंपाऊंडमध्ये धाड टाकण्यात आली.रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत या कारखान्यात एमडी तयार केले जाते आणि त्यानंतर ते सर्वत्र पाठवले जात असल्याची माहिती या धाडीत पोलीसांना मिळाली आहे.या कारवाईत ५ जणांना अटक करण्यात आली असून,त्यातील ४ जण मुंबई आणि एक नालासोपारातील असल्याचे समजते.या प्रकरणी सदर कारखाना उभा करणारे बांधकाम ठेकेदार,जागा मालक,महापालिका अधिकारी आणि स्थानिक पोलीस तितकेच जबाबदार असून, त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.






