सौजन्य - नवराष्ट्र टीम
सासवड : सासवडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सासवड पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर बेकायदा धंद्याविरोधात जोरदार कारवाया सुरु केल्या आहेत. सासवडसह पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागातील बेकायदा दारूविक्री, मटका, लॉटरी, जुगार, हुक्का पार्लर वरती कारवाई करून त्यांना कायद्याचा बडगा दाखवला आहे. तर पश्चिम भागातील बोपगावमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून तब्बल २१ लाख ७० हजारांचा सुगंधी मिश्रित गुटखा जप्त केला आहे.
राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळ प्रतिबंधक कायद्याची जोरदार अंमलबजावणी सुरु केली असून, संपूर्ण राज्यात तुकाराम मुंढे यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे. त्याच धर्तीवर पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी बेकायदा धंदे करणाऱ्यांचे कंबरडे चांगलेच मोडले आहे. बोपगावच्या कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा जप्त करून धंदे करणाऱ्यांसह त्यांना आश्रय देणाऱ्यांनाही दणका दिला आहे.
पोलीस शिपाई प्रणय मखरे यांनी सिराज शेख (रा. शितल पेट्रोलपंपाचे शेजारी, कोंढवा खुर्द, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बोपगावच्या हद्दीत कानिफनाथ गडाकडे जाणाऱ्या रोडवर एका गोडाऊन मध्ये मानवी जीवीतास अपायकारक असलेल्या प्रतिंबंधीत गुटखा पान मसाला, सुगंधी तंबाखूचा साठा करण्यात आला असल्याची सासवड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी २५ जून रोजी दुपारी पोलिसांनी कानिफनाथ गडाकडे जाणाऱ्या रोडवरील एका गोडावून मध्ये छापा टाकून पहाणी केली. त्यावेळी सिग्निचर फिनेस्ट पान मसाला, अॅक्शन ७ कंपनीचा सुगंधी तंबाखू, आर. के कंपनीचा सम्राट पान मसाला, आर. के कंपनीचा एस.टी-१ कंपनीचा सुगंधी तंबाखु असा एकुण २१ लाख ७०,९६० रूचा मुददेमाल मिळुन आला. त्यानंतर पोलिसांनी दोन टेम्पोतून सर्व मुद्देमाल जप्त करून सासवड पोलीस ठाण्यात आणला.
सदरची कारवाई जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांच्या सूचनेवरून उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, पोलीस हवालदार विशाल जाधव, अभिजीत कांबळे, प्रणय मखरे, पोलीस शिपाई सचिन किवळे, अक्षय चिले, वाहनचालक महिला पोलीस शिपाई पल्लवी काळे यांच्या पथकाने केली आहे. पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील पुढील तपास करीत आहेत.






