
अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाला गंडा; तब्बल 10.74 कोटींची 'अशी' झाली फसवणूक
पुणे : पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला तुमचे बँक खाते एका गुन्ह्यात पैसे घेण्यासाठी वापरण्यात आले असून, याबाबत तुम्हाला अटक होऊ शकते. अटक टाळण्यासाठी म्हणून तब्बल १० कोटी ७४ लाख रुपये पाठवण्यास भाग पाडून फसवणूक करणाऱ्या रिलस्टार तसेच या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ‘सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून ज्येष्ठाला धमकावले होते.
रोहन रामेश्वर जाधव (वय २६, रा. सूर्य अपार्टमेंट, गजानननगर, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), ३१९(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६ (सी), ६६ (बी) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली भीती दाखवून विविध बँक खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्यास भाग पाडल्याचे तपासात समोर आले आहे. या गुन्ह्यात यापुर्वी हर्षद सुभाष धनतोले (वय २६, रा. कर्वेनगर), समर्थ सुरेश देशमुख (वय २४, रा), अमर अत्तरगी (वय २४) तसेच प्रणव करणसिंग आर्या (व्य ३१, रा दिल्ली) यांना अटक केली आहे.
रोहन जाधव हा मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील असून, त्याचे बीएससीपर्यंतचे शिक्षण झालेले आहे. तो पिंपळे गुरव भागात राहण्यास असून, रिलस्टार म्हणून प्रसिद्ध आहे. रोहन जाधव सोबतच त्याच्या टोळीने जवळपास २९ गुन्हे देखील उघडकीस आले आहेत.
75 लाखांवरून जाळ्यात
तांत्रिक तपासादरम्यान फसवणुकीच्या रकमेपैकी ३० जानेवारी रोजी एका बँक खात्यात ७५ लाख रुपये भरल्याचे समोर आले. नंतर त्या खात्यातून बँक ऑफ महाराष्ट्रच्या तीन वेगवेगळ्या खात्यांवर एकूण ६ लाख ५० हजार रुपये वर्ग करण्यात आले होते. सायबर क्राइम पोर्टलवरून मिळालेली माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. फरार आरोपी रोहन जाधवचा शोध घेताना पोलिसांनी त्याचे विविध बँक व्यवहार, आर्थिक देवाण-घेवाण तसेच टोळीतील इतर आरोपींशी असलेले संबंध तपासले. या तपासातून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे रोहन जाधव याला पिंपळे गुरव येथून ताब्यात घेण्यात आले.
नेमकी घटना काय?
पोलिसांच्या माहितीनुसार, २३ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत आरोपींनी ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या आधारकार्डचा वापर करून त्यांच्या नावाने कॅनरा बँकेत बनावट खाते उघडले. या खात्याचा वापर यापूर्वी दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासात आढळून आला. संबंधित खात्यावर तब्बल २४ जणांनी फसवणुकीच्या तक्रारी केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
…अशी केली फसवणूक
टोळीने ‘तुम्हाला अटक होणार आहे, आहे, तसेच तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही अटक होऊ शकते’, अशी भीती दाखवली. तसेच, गुंतवणुकीची रक्कम आरोपींनी दिलेल्या बँक खात्यांवर वर्ग करण्यास सांगितले. आरोपींनी स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून ही फसवणूक केली. त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरून घेण्यात आले आणि एकूण १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
संतापजनक घटना ! बँकेतून पैसे काढले अन् बाजारात भामट्यांनी डाव साधला ! ८५ हजारांची रोख रक्कम लंपास