मुंबई : चेंबूर भागातील एका अनाथ आश्रमातून (Orphanage) १७ ते २० डिसेंबरदरम्यान १३ ते १७ वयोगटातील पाच मुले बेपत्ता (Missing) झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या मुलांचे अपहरण झाल्याचा संशय (Suspicion) व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून शोध घेण्यात येत असल्याची माहिती चेंबूर पोलिसांनी (Chembur Police) दिली.
चेंबूरच्या एका अनाथाश्रातून १७ डिसेंबर रोजी १३ आणि १४ वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला होता. तसेच, १८ डिसेंबर रोजी आणखी १५ आणि १७ वर्षांचा, तर २० डिसेंबर रोजी १४ वर्षांचा एक मुलगा बेपत्ता झाला. मुलांना बाहेर खेळण्यासाठी सोडल्यानंतर हा प्रकार घडला, असे सांगण्यात येत आहे. संबंधित अनाथ आश्रम जिल्हा महिला बाल विभागांतर्गत (District Women Child Department) चालवण्यात येत असून येथे १२ ते १८ वयोगटातील अनाथ मुलांचे संगोपन करण्यात येते.
पोलिसांकडून बेपत्ता मुलांचा शोध घेण्यात येत आहे. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याची माहिती चेंबूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयकुमार सुर्यवंशी यांनी दिली आहे. तसेच, पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.