
शाळा सुटल्यानंतर प्रवेशद्वारावर थरार! व्हिडिओच्या वादातून विद्यार्थिनीवर चाकूने सपासप वार
बावधन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी याबाबत माहिती दिली. महाळुंगे गावात विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल ही शाळा आहे. शाळेमधील नववीच्या विद्यार्थ्यांची १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी पाचगणी, महाबळेश्वर येथे सहल गेली होती. या ठिकाणी कार्यक्रमात मुली डान्स करत असतानाचा व्हिडिओ त्यांच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलाने त्याच्या इंस्टाग्रामवर टाकला. या कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यामुळे त्याला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला होता. इंस्टाग्रामवर टाकलेला व्हिडिओ डिलीट करावा लागल्याचा राग विद्यार्थ्यांच्या मनात होता.
शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे विद्यार्थी शाळेत आले होते. दुपारी दोनच्या सुमारास शाळा सुटली. मुलगी शाळेच्या गेटवर असतानाच सव्वादोनच्या सुमारास विद्यार्थ्यांने मुलीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. तिच्या छातीवर आणि डाव्या डोळ्याजवळ त्याने चाकूने वार केले. यात मुलगी गंभीर जखमी झाली. तिला बाणेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलीची प्रकृती स्थिर असून उपचार चालू आहेत. अल्पवयीन मुलाला बावधन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विद्यार्थ्याला शाळेतून केले कमी
या घटनेनंतर विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल व्यवस्थापनाने एक निवेदन जारी केले आहे. शाळेच्या परिसरात घडलेल्या घटनेमुळे आम्हाला अत्यंत दुःख झाले आहे. सध्या आमचे संपूर्ण लक्ष संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केंद्रित आहे. जखमी विद्यार्थिनीला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, त्यांच्या चौकशीत शाळा पूर्ण सहकार्य करत आहे. तसेच, विद्यार्थ्यांना आवश्यक भावनिक आधार देण्यासाठी शाळेतील समुपदेशक कार्यरत आहेत.
या घटनेची गंभीर दखल घेत, संबंधित विद्यार्थ्याविरुद्ध शाळेच्या शिस्तविषयक नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्याला शाळेतून निष्कासित करण्यात आले आहे. याशिवाय, शाळेच्या परिसरातील सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये वरिष्ठ वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या दप्तरांची काटेकोर तपासणी तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी इतर प्रतिबंधात्मक उपायांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
Ans: सहलीदरम्यान विद्यार्थिनींच्या डान्सचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर वाद झाला होता. व्हिडिओ डिलीट करावा लागल्याच्या रागातून विद्यार्थ्याने हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Ans: महाळुंगे गावातील विबग्योर ग्रुप ऑफ स्कूलच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी (दि. २३) दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली.
Ans: विद्यार्थिनीच्या छातीवर आणि डाव्या डोळ्याजवळ चाकूने वार करण्यात आले. तिला बाणेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी अल्पवयीन विद्यार्थ्याला बावधन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.