सिया-चेतनचा 4 महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह; दोघांनीही कुटुंबियांना ठेवले होते अंधारात
पुणे : केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात आतापर्यंत ८ महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले असून, यामध्ये लोहगड किल्ल्यावरील सुरक्षारक्षक तसेच पायऱ्यांच्या मार्गावरील विक्रेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, शुक्रवारी आरोपी सिया गोयलच्या भावाचीही पोलिसांनी चौकशी करून काही महत्त्वाची माहिती जाणून घेतली आहे.
केतन अगरवाल यांचा १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर मृत्यू झाला होता. सुरुवातीला या घटनेकडे अपघात म्हणून पाहिले जात असले तरी तपासादरम्यान संशय बळावल्याने तीन दिवसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली. सध्या दोघेही पोलिस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाशी संबंधित विविध व्यक्तींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. लोहगडावरील सुरक्षारक्षक, पायरी मार्गावरील विक्रेते तसेच अन्य संबंधित व्यक्तींना विचारपूस करण्यात आली असून, आतापर्यंत एकूण आठ जणांचे जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली.
याशिवाय सिया गोयलच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचाही पोलिसांकडून सखोल अभ्यास केला जात आहे. शुक्रवारी तिच्या भावाची चौकशी करण्यात आली. सियाचा स्वभाव, केतन अगरवाल यांच्याशी होणाऱ्या विवाहाबाबत तिची भूमिका, लग्नासाठी तिच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्यात आली होती का? तसेच दोघांमधील संबंधांचे स्वरूप काय होते, या मुद्द्यांवर पोलिस माहिती संकलित करत आहेत.
आणखी काही व्यक्तींचे जबाब नोंदवले जाणार?
तपासाच्या पुढील टप्प्यात आणखी काही व्यक्तींचे जबाब नोंदवले जाण्याची शक्यता असून, या प्रकरणातील विविध पैलूंची पडताळणी करून पोलिस पुरावे मजबूत करण्यावर भर देत आहेत.
सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली?
सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पहिली ओळख एका क्रिकेट सामन्यादरम्यान झाली होती. सियाचा भाऊ साहिल आणि चेतन हे दोघेही एकत्र क्रिकेट खेळायचे. साहिलचे सामने पाहण्यासाठी आणि स्वतः खेळण्यासाठी सिया नेहमी भावासोबत जात होती. याच मैदानावर सिया आणि चेतनची पहिली भेट झाली. त्यानंतर एका मित्राच्या दिवाळी पार्टीत हे दोघे पुन्हा समोरासमोर आले. या पार्टीनंतर त्यांच्यात नियमित भेटीगाठी वाढू लागल्या. ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. पोलिसांनी या दोघांची सीडीआर तपासले असता यांच्यात तब्ब्ल २००४ वेळा फोनवर संपर्क झाला होता.






