सौजन्य फोटो - सोशल मि़डीया
पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर तिला आणि तिच्या नातेवाईकांना हत्येच्या प्रकरणात अडकवण्यासाठी पतीने पोलिसांना खोटी माहिती दिल्याचा प्रकार तपासात समोर आला आहे. मात्र, या माहितीच्या आधारे सुरू झालेला तपास पुढे जात असताना पोलिसांसमोर धक्कादायक सत्य उघड झाले. या प्रकरणात पती-पत्नीचाच तब्बल तीन हत्यांशी संबंध असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी माधवदास भक्तिराम साधू आणि त्याची विभक्त पत्नी उर्मिला ऊर्फ जया माधवदास साधू यांना पोलिसांनी अटक केली आहे. मृतांमध्ये उर्मिलाची आजी, तिची बहीण आणि माधवदासची आई यांचा समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे.
ही घटना सुरत शहराशी संबंधित असून, २०२२ मध्ये अहमदाबाद शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या डिटेक्शन युनिटला सुरतजवळील कोसंबा येथे शांता वसावा यांची हत्या करून त्यांचा मृतदेह घरात पुरल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका पुरुष नातेवाईकाला ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, त्याचा या प्रकरणाशी संबंध आढळला नाही. त्यानंतर पोलिसांचा संशय माधवदासकडे वळला. पोलिस तपासानुसार, माधवदास आणि उर्मिला मागील सुमारे आठ महिन्यांपासून विभक्त राहत होते. उर्मिला घरातून जाताना दागिने आणि रोख रक्कम घेऊन गेल्याने माधवदास तिच्यावर नाराज होता. याच कारणातून तिला आणि तिच्या नातेवाईकांना हत्येच्या प्रकरणात गोवण्यासाठी त्याने खोटी माहिती दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.
चौकशीदरम्यान पोलिसांना या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती मिळाल्याचे सांगण्यात येते. माधवदास आणि उर्मिला यांच्या सहभागातून तीन हत्या झाल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. २०२२ मध्ये शांता वसावा यांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह ड्रममध्ये ठेवून त्यात सिमेंट भरण्यात आले. त्यानंतर हा ड्रम खड्ड्यात पुरल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान पोलिसांनी जमिनीखाली पुरलेला मृतदेह कायदेशीर प्रक्रियेनुसार बाहेर काढला आहे.
उर्मिलाची बहीण भगवती कमलेश वसावा हिला क्षयरोगाचा त्रास होता. पोलिसांच्या तपासानुसार, तिच्या तोंडावर उशी दाबून हत्या करण्यात आली आणि मृतदेह जमिनीत पुरण्यात आला. याशिवाय माधवदासची आई आणि उर्मिलाची सासू मंजुळा भक्तिराम साधू हिलाही अर्धांगवायूचा गंभीर आजार होता. तिचीही उशी दाबून हत्या केल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी घाईघाईने अंत्यसंस्कार केल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात येते.
या प्रकरणात तीन हत्या उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून मिळालेली माहिती, पुरावे आणि मृतदेहांचे अवशेष यांची पडताळणी सुरू केली आहे. तिन्ही हत्यांमागे नेमका काय हेतू होता, हत्यांमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का आणि पुरावे नष्ट करण्यासाठी नेमक्या कोणत्या पद्धती वापरण्यात आल्या, याचा तपास सुरू आहे. चार वर्षांपूर्वीच्या एका खोट्या माहितीपासून सुरू झालेला तपास थेट तीन हत्यांपर्यंत पोहोचल्याने या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.






