
महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर अटक; आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणाला वेग
वडगाव मावळ : वडगाव शहरातील एका २२ वर्षीय युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील तब्बल दहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला वडगाव मावळ पोलिसांनी अखेर अटक करण्यात यश मिळविले आहे. या कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रकरणाच्या तपासाला वेग मिळाला असून मृत युवतीच्या कुटुंबीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्राण ज्ञानेश्वर येवले (वय २७, रा. वडगाव मावळ) असे असून, तो पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित युवतीने २४ जुलै २०२५ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी युवतीला सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तपासादरम्यान दोन आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोपींपैकी एक असलेला प्राण येवले हा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला होता. गेल्या दहा महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. विविध ठिकाणी वास्तव्य बदलत असल्याने त्याचा माग काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते.
वडगाव मावळ पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले होते. तांत्रिक तपास, गोपनीय माहिती तसेच विविध जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम राबवून त्याचा मागोवा घेण्यात आला. अखेर मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेत अटक केली. अटकेनंतर आरोपीला वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने प्रकरणाच्या तपासासाठी त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या चौकशीतून या प्रकरणातील आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
हे सुद्धा वाचा : पाणीपुरी खायला घालणं महागात पडलं, सनकी आशिकने दुकानदारावर चाकूने केला प्रहार
दरम्यान, आरोपीच्या अटकेनंतर मृत युवतीच्या नातेवाईकांनी न्यायव्यवस्था आणि पोलिसांवर विश्वास व्यक्त केला आहे. “उशिरा का होईना, पण आरोपीला अटक झाली. आता या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई होऊन मुलीला न्याय मिळावा,” अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली. या घटनेने त्या काळात वडगाव मावळ परिसरात मोठी खळबळ उडाली होती. आता मुख्य आरोपीला अटक झाल्यामुळे प्रकरणाच्या सुनावणीला आणि तपास प्रक्रियेला अधिक गती मिळणार असल्याचे बोलले जात आहे. पुढील तपास वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.