
एकाच पोलिस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात, एकाला लाच घेताना रंगेहात पकडले; तर दुसरा...
पुणे : एकाच दिवशी शिरुर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस हवालदार लाचप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्याच्या नावाखाली दोघांनी ही लाच मागितली होती. सर्वात महत्वाचे म्हणजे एकाच दिवशी सापळा कारवाई करण्याची पहिलीच घटना शिरुर पोलिस ठाण्यात घडली. पहिल्या कारवाईत ११ हजार घेताना पोलिस हवालदाराला रंगेहाथ पकडले तर, दुसर्या कारवाईत ९५ हजारांची लाच घेताना पोलिसाने पळ काढळा आहे. दोन्ही कारवाई बुधवारी झाल्या आहेत.
सतीश नाथाराव मुंढे (वय ४६) असे लाच घेऊन पळून गेलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. शिरुर पोलिस ठाण्यात तक्रारदार व त्यांचे कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार मुंढे याच्याकडे आहे. या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांना अटक न करण्यासाठी व गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी मुंढे याने १ लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांने यासंदंर्भात एसीबीकडे तक्रार दिली. एसीबीने केलेल्या पडताळणीत मुंढे याने स्वत:साठी व वरिष्ठांच्या नावाने सुरुवातीला १ लाख रुपये व नंतर तडजोडीअंती ९५ हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदाराकडून सतीश मुंढे याने ९५ हजार रुपये स्वीकारले. त्यावेळी त्याला सापळा पथकाची चाहूल लागली. लाच रक्कम घेऊन तो पळून गेला आहे. त्याचा शोध घेतला जात असून शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई जुने शिरुर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. शिवाजी ज्योतीराम बनकर (वय ४४, रा. स्वप्नपूर्ती निवास, घोलेगाव रोड, शिरुर) असे पकडलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. तक्रारदार व त्यांचे आई, वडिलांच्या विरोधात शिरुर पोलिस ठाण्यात (१९ ऑगस्ट २०२६) अतिक्रमण करुन मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार शिवाजी बनकर याच्याकडे आहे. तक्रारदार व त्यांच्या आई वडिलांना अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी हवालदार बनकर याने तक्रारदारांकडे १५ हजारांची लाच मागितली. तक्रारदार यांनी अटकेच्या भितीने बनकर याला ५ हजार रुपये दिले.
तक्रारदारांची एसीबीकडे तक्रार
पुन्हा दहा हजारांची मागणी झाल्यानंतर तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार केली. याची एसीबीने पडताळणी केली. जुने शिरुर पोलिस ठाण्यात सापळा कारवाईत तक्रारदाराकडून ४ हजार रुपये घेण्याचे मान्य करुन उर्वरित ११ हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी पोलिस हवालदार बनकर याला ११ हजार रुपयांची लाच घेताना पथकाने रंगेहात पकडले. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शैलजा शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.