सौजन्य - नवराष्ट्र टीम
बारामती : सन २०२१ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकीच्या गुन्ह्यात न्यायालयीन प्रक्रियेला सातत्याने अनुपस्थित राहणाऱ्या वॉरंटधारक आरोपीला बारामती शहर पोलिसांनी अखेर कसबा परिसरातून अटक केली आहे. देवेंद्र रामचंद्र घोडके असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४२/२०२१ नुसार भारतीय दंड संहिता कलम ३२४, ५०४, ५०६ व ३४ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना आरोपी न्यायालयीन प्रक्रियेस नियमित उपस्थित राहत नसल्याने त्याच्याविरुद्ध वेळोवेळी समन्स व अटक वॉरंट बजावण्यात आले होते. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, ८ ऑक्टोबर २०२१ रोजी खंडोबानगर परिसरात रस्त्यावर ठेवलेला लोखंडी रॅक बाजूला करण्यावरून वाद झाला होता. या वादातून आरोपीने कुकरने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर शिवीगाळ व धमकी देत लोखंडी कोयता घेऊन फिर्यादीच्या दिशेने धावून आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. प्रलंबित वॉरंटच्या बजावणीसाठी पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी व पोलीस हवालदार उदय टापरे यांनी सातत्याने आरोपीचा शोध घेतला. आरोपी कसबा परिसरातून जाणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. “न्यायालयीन समन्स व वॉरंटचा आदर करून संबंधितांनी न्यायालयीन प्रक्रियेस उपस्थित राहावे. वॉरंट टाळून कायद्यापासून सुटका होणार नाही,” असा स्पष्ट संदेश बारामती शहर पोलिसांनी दिला आहे.
वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
‘मावशी, साप आला!’ असे सांगून वृद्ध महिलेला घाबरवत तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेणाऱ्या टोळीतील एका आरोपीला यवत पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेले सुमारे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे आक्कासाहेब डोरले व काळ्या मण्यांची पोत, तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटारसायकल असा एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना दौंड तालुक्यातील दापोडी येथे घडली आहे.






