कल्याणमध्ये ‘गायकवाड विरुद्ध गायकवाड’ वाद पुन्हा उफाळणार
Kalyan Politics: कल्याणमधील राजकारण पुन्हा एकदा ‘गायकवाड विरूद्ध गायकवाड’ असा वाद उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात, भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणामुळे कल्याणचे राजकारणही चांगलेच तापले होते.
या प्रकरणापासून गणपत गायकवाड तुरुंगात आहेत. पण आता पुन्हा या दोघांमधील वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचा गणपत गायकवाड गट आणि शिवसेनेच महेश गायकवाड या दोन गटात पुन्हा एकमेकांविरोधात उभे ठाकण्याची चिन्हं दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील सप्तशृंगी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना जाहीर झालेल्या ५ लाख रुपयांच्या शासकीय मदतीच्या वाटपावरून हा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पिडीतांना ही मदत वाटण्यात आली होती.पण यावरून आता नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कल्याण (पूर्व) मतदारसंघातील मतदारांनी गायकवाड कुटुंबावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. तुरुंगात असलेले भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड यांनी त्यांच्या पतीचे दीर्घकालीन राजकीय प्रतिस्पर्धी महेश गायकवाड यांचा 26,408 मतांनी पराभव करत निर्णायक विजय मिळवला होता.
सुलभा गायकवाडांच्या या विजयामुळे गायकवाड कुटुंबाचा कल्याणच्या राजकारणातील प्रभाव पुन्हा अधोरेखित झाला आहे. त्यामुळे भाजपसाठीही सुलभा गायकवाड यांचा हा विजय राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कल्याण पूर्वमधील सप्तशृंगी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना देण्यात आलेल्या पाच लाख रुपयांच्या सरकारी मदतीचे धनादेश भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयातून वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास महसूल विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांना श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण
ही मदत वाटप सोहळा सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयातच आयोजित केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आणि टीकेला उधाण आले आहे. विरोधकांनी यावर आक्षेप घेत, सरकारी मदत खासगी राजकीय कार्यक्रमातून वाटली जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे कल्याण पूर्वमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. सप्तशृंगी इमारत दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाइकांना वाटप करण्यात आलेल्या सरकारी मदतीवरून शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांनी भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
“सरकारी निधी देऊन स्वतःच्या झोळीत पुण्य मिळवण्याचा प्रयत्न सुलभा गायकवाड करत आहेत,” असा आरोप महेश गायकवाड यांनी केला. “कल्याण पूर्वमध्ये यापूर्वीही अनेक दुर्घटना घडल्या. त्यावेळी बाधित नागरिकांना एक रुपयाचाही निधी देण्यात आलेला नाही. मात्र, आता सरकारचा निधी माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवशी वितरित केला जातो, हे दुर्दैवी आहे,” असे गायकवाड म्हणाले. या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित तहसीलदार आणि महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.