
अनिस बाबा बनून आसिफ देत होता गुंगारा; मुंबईतील रेड लाईट परिसरातून पोलिसांनी ठोकल्या बेड्या
छत्रपती संभाजीनगर : ऑक्टोबर २०२५ मध्ये शहाबाजार परिसरात समीर खान इनायत खान उर्फ मालेगाव (रा. चेलीपुरा) याची भररस्त्यात तलवारीने निघृण हत्या घडवून आणणारा मुख्य सूत्रधार आसिफ उर्फ रायडर सय्यद हनीब (३३, रा. काचीवाडा, चेलीपुरा) अखेर नऊ महिन्यांनंतर गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे. खुनानंतर मुंबईतील कबूतरखाना, करिमनगर परिसरात अनिस बाबा या नावाने पत्नी, मुले, सासू आणि मेव्हणीसह राहत पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या रायडरला गुन्हे शाखेच्या पथकाने तीन दिवसांच्या थरारक शोधमोहीमेनंतर अटक केली आहे. तपासात समीर खानच्या हत्येचा कट रायडरने रचल्याचे आणि त्याच्या सांगण्यावरून साथीदारांनी प्रत्यक्ष खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक प्रविण पाथरकर, अर्जुन कदम, हवालदार योगेश नवसारे, विजय निकम, जालीदार गोरे, राजेश यदमळ, राहुल बंगाळे, विजय घुले, लखन गायकवाड, प्रमोद सुरशे, संजीवनी शिंदे, माया माळी आदींनी केली.
समीर खान हा शहागंज मंडीपरिसरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी त्याच्यावर व साथीदार शाहरुखवर धारदार शस्त्राने हल्ला झाला होता. त्यानंतर समीरने आसिफ रायडर, शोएब काला, हफिज उर्फ टकला व इतरांविरुद्ध धमकी, शिवीगाळ व मारहाणीची तक्रार दाखल केली. याचाच राग मनात धरून आसिफ रायडरने समीरच्या खुनाचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले.
३१ ऑक्टोबर २०२५ रोजी निशान दर्गा परिसरात समीरवर तलवारी व धारदार शस्त्रांनी ३० ते ३२ सेकंदांत सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या समीरचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पत्नी सना कौसर यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.
अल्ताफ गँगच्या मोबाइलमधून लागला सुगावा
एनडीपीएस कारवाईत अटक झालेल्या अल्ताफ गैंगच्या मुख्य आरोपी आणि सदस्याच्या मोबाइलमध्ये आसिफ रायडरचा नवीन क्रमांक पोलिसांना मिळाला होता, त्यानंतर त्याच्या हालचालींवर गुप्तपणे लक्ष ठेवण्यात आले. तपासात रायडरने मुंबईत अल्ताफ गैंगच्या काही सदस्यांना आश्रय दिल्याची माहितीही समोर आली.
अनिस बाबा बनून राहत होता
मोबाइलवरुन रायडर हा खुनानंतर थेट मुंबईला पळाल्याचे समोर आले. कबुतरखाना, करिमनगर येथील रेड लाईट परिसरात त्याने अनिस बाबा या नावाने राहण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कबुतर खान्यात फोटो दाखवून चौकशी केली असता, हा आसिफ रायडर नसून अनिस बाबा आहे, असेच उत्तर स्थानिक नागरिकांडून मिळत होते.
पाऊस, रेकी अन मध्यरात्रीची कारवाई
रायडर दिवसा घराबाहेर पडत नसून रात्रीच कामानिमित्त बाहेर येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुसळधार पावसामुळे सलग दोन दिवस शोधमोहीम खोळंबली. अखेर उपनिरीक्षक पाथरकर व त्यांच्या पथकाने रात्रभर गल्लीबोळांत रेकी सुरू ठेवली. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पथक चहाच्या टपरीवर असताना रायडर दुचाकीवर तेथे आला. पोलिसांना पाहताच तो पळाला; मात्र पाठलाग करून त्याला पकडण्यात आले.
तुम्ही डीबीचे… म्हणताच उघड झाला गुन्हा
आता मुंबईला बदली झाल्याचे सांगत त्याचा विश्वास जिंकला. त्यानंतर रायडरने संभाजीनगरातील खुनानंतर नाव बदलून येथे राहत असल्याची माहिती दिली. त्याच क्षणी पोलिसांनी त्याच्या हातात बेड्या ठोकल्या.