महिलांसह मुलींचे गायब होण्याचे वाढतंय प्रमाण; धक्कादायक आकडेवारी आली समोर...(iStock Photo)
मुंबई : महाराष्ट्रात महिलांसह मुलींचे गायब होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. राज्यातील तब्बल २.५६ लाख महिला आणि मुली गायब झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. या गंभीर परिस्थितीवर संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात एक मोठे रॅकेट कार्यरत आहे आणि सरकारने यावर वेगाने कारवाई करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर आरोप करत म्हटले की, गायब महिलांचा शोध घेण्याच्या बाबतीत सरकारचे धोरण खूपच नकारात्मक आहे. सरकार नेहमी दावा करते की, ८० टक्के महिलांना शोधून काढले आहे, पण ही सर्व फसवणूक आहे. यामध्ये मोठं रॅकेट आहे आणि सरकार त्यावर दुर्लक्ष करत आहे. गृह खाते आणि राज्य सरकारच्या असंवेदनशीलतेवरही टीका केली. माझ्या महाराष्ट्रात एवढ्या प्रमाणात मुली आणि महिलांचा बेपत्ता होणे गंभीर चिंता आहे. गृह खात्याला काय झोप लागली आहे? त्यांना रस्त्यावर भीक मागणाऱ्यांचे डीएनए तपासावे लागेल.
हेदेखील वाचा : Mumbai Missing Girl: मुंबईला कोणाची नजर लागली? 268 मुली गायब, तर 82 मुले बेपत्ता, मुलींची धक्कादायक आकडेवारी समोर
दरम्यान, पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये अल्पवयीन मुलीच्या विवाहाच्या नावाखाली होणारा विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गरीब आदिवासी कुटुंबांना फसवून, एजंट्स त्यांच्या भवितव्याबद्दल विचार न करता केवळ आर्थिक लाभासाठी त्यांचा वापर केला जात मुलीचा सौदा ४०००० ते ५०००० रुपयांमध्ये करत आहेत.
…तरी बेपत्ता म्हणून तक्रार
राज ठाकरे यांच्या पत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पत्र सविस्तर वाचले नसले तरी, बेपत्ता मुलीच्या आकडेवारीवर त्यांनी स्पष्टीकरण दिले. मी अजून पत्र वाचलेलं नाही, पण बेपत्ता होणाऱ्या मुलींसंदर्भात आकडेवारी सहित त्याची कारणं दिली आहेत. परत किती येतात हेही सांगितलेलं आहे. एखादी मुलगी घरून भांडून गेली आणि ती तीन दिवसांत परत आली तरी तिची बेपत्ता म्हणून तक्रार नोंदवली जाते. यामुळे बेपत्ता झालेल्यांची संख्या मोठी दिसते.
९० टक्क्यांहून अधिक मुलींना परत आणण्यात यशस्वी
आम्ही वर्षभरात ९० टक्क्यांहून अधिक मुलींना परत आणण्यात यशस्वी होतो, उर्वरित मुली पुढील वर्ष-दीड वर्षात परत येतात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, पत्र वाचल्यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक शंकेला योग्य उत्तर देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.
मुलांच्या अपहरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय
महाराष्ट्रमधून ८२ मुले-मुली बेपत्ता होणे, मुलांचे अपहरण रॅकेट आणि आंतरराष्ट्रीय शोषण हे सर्व राज्यातील मुले सुरक्षित नसल्याचा स्पष्ट इशारा देतात. 21 व्या शतकात प्रगतीशील आणि स्वप्ननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात हे चित्र धक्कादायक असल्याचे विधान आमदार सचिन अहिर यानी केले. मुंबईमध्ये ३६ दिवसांत ८२ मुले-मुली बेपत्ता झाल्या असून, नागपूरमध्ये देखील मुले पळविणाऱ्यांचे रॅकेट पकडले गेले हे धक्कादायक चित्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.






