संग्रहित फोटो
जळगाव : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता हिमाचल प्रदेशात खून केल्यानंतर मुंबईच्या दिशेने पसार झालेल्या चार आरोपींच्या पलायनाला जळगावातच ब्रेक लागला आहे. प्रवासासाठी पैसे संपल्याने मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरलेल्या आरोपींचे लोकेशन हिमाचल प्रदेश पोलिसांनी जळगाव पोलिसांना कळविले. माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी शोधमोहीम राबवून चौघांना ताब्यात घेतले.
हिमाचल प्रदेशातील मुकेश कुमार यांच्या खूनप्रकरणी एफआयआर क्रमांक ८२/२०२६, दि. ३० सप्टेंबर २०२६ अन्वये गुन्हा दाखल आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुकेश कुमार व आरोपी एकत्र दारू पीत असताना बहिणीवरून शिवीगाळ केल्याच्या कारणातून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी हल्ला करून मुकेश कुमार यांचा खून केल्याची माहिती हिमाचल पोलिसांनी दिली.
घटनेनंतर आरोपी सकाळी सुमारे ११ वाजता किसंपूर येथून निघाले. अंबाला येथे पोहोचल्यानंतर दुपारी ४.३० वाजता मुंबई एक्स्प्रेस पकडून त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला. मात्र, प्रवासात खायलाही काही घेण्यासाठीही पैसे संपल्याने मोबाईल विकून पैसे उभे करण्यासाठी ते जळगावात उतरले. याचदरम्यान त्यांचे लोकेशन पोलिसांना मिळाले. हिमाचल प्रदेश पोलिसांनी शनिपेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना आरोपी शनिपेठ हद्दीत असल्याची माहिती दिली. त्यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने सूचना देत शोधमोहीम राबविली. हालचालींचा माग काढत पथकाने चौघांना ताब्यात घेतले.
चौघेही आरोपी बिहारचे
ताब्यात घेतलेल्यांमध्ये चंदन कुमार व रोशन गोगल मुखिया (रा. कुतुबपूर, पोलीस ठाणे सकरा, जि. मुझफ्फरपूर), संतोष कुमार (रा. बरियारपूर, जि. मुझफ्फरपूर) आणि अजित कुमार जोगा मेहतो (रा. पंडरक, जि. पाटणा, बिहार) यांचा समावेश आहे. चौघांना ताब्यात घेण्यासाठी हिमाचल प्रदेशातील तपासी अधिकारी जळगावकडे रवाना झाले आहेत. पुढील कायदेशीर प्रक्रिया हिमाचल पोलिसांच्या ताब्यात आरोपी दिल्यानंतर होणार आहे.






