सौजन्य - सोशल मिडीया
धाराशिव : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप होत असलेल्या कळंब येथील मनीषा कारभारी बिडवे या महिलेची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. महिला मनीषा बिडवेची हत्या अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातूनच झाल्याची माहिती समोर आली आहे. हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी ही माहिती दिली. सदर प्रकरणात रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद अशी या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींनी हत्येबाबत कबुली दिल्याची माहिती धाराशिवचे अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी दिली. या हत्या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महिलेचा खून केल्यानंतर मुख्य आरोपी रामेश्वर भोसले हा तिच्या मृतदेहासोबत दोन दिवस झोपला होता, असा दावा केला जात आहे. तसंच तिच्या मृतदेहाच्या शेजारी बसूनच त्याने जेवणही केल्याची माहिती आहे. हत्येनंतर महिलेच्या मृतदेहासोबत आरोपी दोन दिवस झोपला होता, त्याशेजारी बसून त्याने जेवण केले, असे बोलले जात आहे. मात्र तीन दिवसांनी वास असह्य झाल्यानंतर महिलेची गाडी घेऊन रामेश्वर भोसले घराबाहेर पडला.
रामेश्वरने केज येथील मित्र उस्मान गुलाब सय्यद याला महिलेची हत्या केल्याचं सांगितलं आणि कळंबला सोबत आणून तिचा मृतदेहही दाखवला. त्यानंतर दोघांनी पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नसल्याचे बोलले जाते. त्यांनी अखेर महिलेच्या मृतदेहावर चादर घातली. शेजारा-पाजाऱ्यांना वास आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना सांगितलं.
महिला ब्लॅकमेल करत होती?
हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी रामेश्वर भोसले हा संबंधित महिलेकडे गाडीवर ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. महिलेकडे त्याचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो होते, ते दाखवून मयत महिला आपल्याला टॉर्चर करत होती, असा आरोप त्याने पोलिसांकडे केला आहे. २२ मार्चला त्याने महिलेची हत्या केली, त्या दिवशी आधी तिने आरोपीला उठाबश्या काढायला लावल्या होत्या, असेही तपासात समोर आले आहे.
बीड पोलिसांचा बोलण्यास नकार
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनैतिक संबंध असल्याचा दाखवण्यासाठी या महिलेचा वापर झाला का यावर बीड पोलिसांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिला असून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक करत असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक शपथ आमना यांनी सांगितला आहे .