
सासवडला पुन्हा तीन मेडिकल दुकाने फोडली, पोलिसांना चोरट्यांचे आव्हान; कोम्बिंग ऑपरेशन सुरु
सासवड : मागील दोन दिवसापूर्वी सासवडमध्ये चोरट्यांनी एकाच रात्रीत तब्बल नऊ मेडिकलची दुकाने फोडली होती. याप्रकरणी अद्याप तपासालाही सुरुवात झाली नसतानाच चोरट्यांनी पुन्हा तीन मेडिकल दुकाने फोडून एकप्रकारे पोलिसांनाच आव्हान दिले आहे. दुकानातील वस्तूंची चोरी, शटरचे नुकसान यासोबतच हजारो रुपयांची रोकड चोरीला गेल्याने मेडिकल व्यावसायिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर सासवड पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरु केले आहे.
बुधवारी सासवडमध्ये एकाच रात्रीत मेडिकलची आठ ते नऊ दुकाने फोडल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा जेजुरी नाका, वनपुरी चौक तसेच ग्रामीण भागातील अनेक मेडिकल दुकानाना लक्ष केले असून, या घटनांचा अद्यापही तपास लागलेला नाही. त्यातच पुन्हा नऊ दुकाने फोडल्याने मेडिकल व्यावसायिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. या घटनांना पायबंद घालण्यासाठी आणि तपास तातडीने लावून गुन्हेगारांना अटक करण्यासाठी मेडिकल असोशिएशनकडून पोलिसांना निवेदनही देण्यात आले आहे.
दरम्यान मेडिकल दुकानातील चोरीच्या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरु करण्यापूर्वीच चोरट्यांनी पुन्हा दुसऱ्याच रात्री तीन मेडिकल दुकाने फोडून एकप्रकारे पोलिसांनाच आव्हान दिले आहे. शुक्रवारी पहाटेच वरद मेडिकल, प्रहर्षा मेडिकल आणि हरेश्वर मेडिकल फोडले आहे. तर एक दवाखान्याचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. यामध्ये फारसे काही हाती लागले नाही. मात्र मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याचे दिसून आले. यामध्ये दोन दिवसापूर्वी फोडण्यात आलेले प्रहर्षा मेडिकल दुकान सलग दुसऱ्यांदा फोडले आहे.
मेडिकलच्या उद्घाटनानंतर काही तासातच चोरी
सासवड- जेजुरी या महामार्गावर श्रीनाथ चौकात पोलीस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर गुरुवारी वरद मेडिकल दुकानाचे उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटनानंतर पहाटे तीन पर्यंत दुकानाचे मालक पहारा देवून होते. मात्र तीन वाजता घरी गेले आणि काही वेळातच साडे तीन वाजता दुकान फोडल्याचे दिसून आले. त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणावरील दुकानेही सुरक्षित नसल्याचे एकंदरीतच दिसून आले आहे.
पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे कोम्बिंग ऑपरेशन
सासवडमध्ये वर्दळीच्या ठिकाणावरील दुकाने सलग फुटत असून एकप्रकारे गुन्हेगारांकडून पोलिसांनाच आव्हान देत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी गुन्हेगारांचे आव्हान मोडीत काढण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे कोम्बिंग ऑपरेशन करण्यास सुरुवात केली आहे. सासवडमध्ये तब्बल ३० गुन्हेगारांची त्यांच्या घरी जाऊन रात्रीत तपासणी करण्यात आली आहे. नाकाबंदी करण्यात येत असून वाहनांची तपासणी कडकपणे करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी वेगवेगळी पोलीस पथके तयार केली असून सर्व बाजूने तपास करण्यास सुरुवात केली आहे.
पुरंदर आणि सासवडमधील चोरीच्या घटना निश्चितच चिंताजनक आहेत, मात्र व्यावसायिकांनी घाबरून जाऊ नये. चोरीच्या घटनांचा तपास तातडीने करण्यात येत असून, संपूर्ण यंत्रणा त्यासाठीं काम करीत आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यात येईल. त्यासोबतच व्यावसायिकांनी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावीत. परिसरातील घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवून संशयास्पद दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. -संतोष घोळवे (पोलीस निरीक्षक, सासवड.)