संग्रहित फोटो
कुर्डुवाडी : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. रेल्वेमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या हँड बॅगमधील सुमारे सव्वा लाखाचा ऐवज असलेली पर्स लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दिनांक १५ रोजी कुर्डुवाडी रेल्वे स्थानकात प्लॅटफार्म क्र १ वर रेल्वेमध्ये चढताना घडली आहे. याबाबत कलम हनुमंत हवालदार (रा. नेरुळ मुंबई) यांनी कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी महिला या आपल्या पतीसह जेऊर येथील पाहुण्यांकडे जाण्यासाठी कुर्डुवाडी रेल्वेस्थानकातील प्लॅट फाॅर्म क्र १ व २ वर इंद्रायणी गाडीची वाट पाहात बसल्या होत्या. दरम्यान दुपारी ३ वाजून १० मिनीटांनी इंद्रायणी एक्सप्रेस आली असता या गाडीतील बोगी नं डी १० मध्ये प्रवाशांच्या गर्दीतून चढत असताना त्यांच्याजवळील हँडबॅग मधील १ लाख २० हजार रुपये किमतीचे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण तसेच १ हजार ७०० रुपये रोख असलेली छोटी पर्स अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरुन नेली. फिर्यादी हवालदार यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यावर कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
जबरदस्तीने महिलेची सोनसाखळी हिसकावली
बिबवेवाडी-स्वारगेट रस्त्याने पायी चालणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेच्या गळ्यातून चोरट्यांनी जबरदस्तीने सोनसाखळी हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला असून, घटनेत महिला थोडक्यात बचावली आहे. चोरट्यांनी हिसका दिल्यानंतर महिला खाली कोसळली. त्यातून ती बचावली आहे. ९९ हजार रुपयांची सोनसाखळी चोरून चोरटे पळून गेले. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात ५५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, दुचाकीवरील दोन चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.