संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देश आणि विदेशात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. चोरटे दररोज नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घालत आहेत. अशातच आता पुण्यातील उत्तमनगर परिसरातील एका महिलेची सायबर चोरट्यानी व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलवर स्वतःला डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियाचा अधिकारी तसेच पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेला आधार कार्डचा गैरवापर झाल्याचे सांगून अटक करण्याची धमकी दिली व तिच्याकडून १० हजार रुपये उकळले. सुदैवाने पुढील रक्कम ट्रान्सफर करताना तांत्रिक अडचण आल्याने महिलेचे खाते रिकामे होण्यापासून वाचले आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या मोबाइलवर १६ ऑगस्टला अनोळखी मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉल आला. त्याने स्वतःचे नाव आर. के. चौधरी सांगून तो मुंबई येथील ‘डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया’ या कार्यालयात वरिष्ठ सल्लागार असल्याचे सांगितले. त्याने महिलेविरुद्ध तक्रार दाखल झाल्याचे सांगून त्याची खोटी कॉपीही दाखवली. नंतर दुसऱ्या व्यक्तीला कॉलमध्ये जोडून त्याने स्वतःची ओळख पोलिस उपनिरीक्षक संदीप रॉय म्हणून ओळख करून दिली व त्याचे बनावट ओळखपत्र दाखवले. महिलेच्या आधारकार्डचा वापर करून फसवणुकीचे प्रकार झाले असून, तिच्या नावाने मुंबईतील कॅनरा बँकेतून अडीच कोटी रुपये इस्लामिक टेररिस्ट संघटनेला ट्रान्सफर झाल्याची बतावणी केली.
महिलेचा त्यावर विश्वास बसावा म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्ट, आरबीआय आणि ईडी आदी संस्थांच्या नावाने बनावट कागदपत्रे पाठवली. तसेच, चौकशी संपेपर्यंत फोन कट न करण्यास, दर दोन तासांनी ‘आय ॲम सेफ’ असा मेसेज पाठविण्यास सांगितले. तसेच, कोणालाही याबाबत माहिती न देण्याची ताकीद दिली. अन्यथा तुरुंगवासाची धमकीही दिली. घाबरलेल्या महिलेने त्यांच्या सांगण्यानुसार स्वतःचा फोटो, आधारकार्ड, सेल्फी व मोबाइल स्क्रीन शेअर केला. त्यानंतर तिच्या खात्यातील पैसे यूपीआय आयडीवर ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले. महिलेला त्यावर शंका आली. तिने हे फ्रॉड असल्याचे बोलले. मात्र, समोरील व्यक्तीने चिडण्याचा आव आणला. त्यामुळे महिलेने घाबरून १० हजार रुपये पाठविले.
मात्र, उर्वरित रक्कम ट्रान्सफर करताना तांत्रिक अडचण आली आणि व्यवहार होऊ शकला नाही. त्यामुळे सायबर चोरट्यांनी महिलेला दुसऱ्या दिवशी पैसे पाठविण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात महिलेने कुटुंबीय आणि मित्र परिवारात घडलेला प्रकार सांगितला असता, हा सायबर फसवणुकीचा प्रकार असल्याचे सांगितले. त्यामुळे महिलेचे संपूर्ण खाते रिकामे होण्यापासून बचाव झाला. त्यानंतर महिलेने उत्तमनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.