संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : बीसीसीआयच्या निवड समितीने आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे देण्यात आली आहे. तर शुभमन गिलकडे उपकर्णधारपद दिले आहे. गिलने जुलै २०२४ मध्ये भारतासाठी शेवटचा टी२० सामना खेळला होता. त्यानंतर त्याला थेट आशिया कप २०२५ मध्ये उपकर्णधार बनवण्यात आले आहे. भारतीय संघ निवडल्यानंतर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी खेळाडूंच्या निवडीबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा : Ind w vs Aus w: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर! हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा
अजित आगरकर म्हणाले की, “अलीकडील टी२० सामन्यांमधून गिलला वगळण्यात आले होते, मुख्यतः वेळापत्रक आणि इतर स्वरूपातील व्यस्ततेमुळे हे झाले होते, ज्यामुळे संजू सॅमसनसारख्या इतर फलंदाजांसाठीचा मार्ग मोकळा झाला होता. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत, विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनला टी२० संघात संधी मिळाल्या होत्या. त्याच वेळी, अभिषेक शर्माने देखील या दरम्यान टी२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली.” यावेळी आशिया कपसाठी संजू सॅमसनसोबत अभिषेक शर्माला देखील संधी देण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेत आगरकर पुढे म्हणाले की, “संजू खेळला त्याचे कारण शुभमन आणि यशस्वी त्यावेळी उपलब्ध नव्हते. त्याच वेळी, अभिषेकला आशिया कपमधून बाहेर ठेवणे खूप कठीण आहे, कारण त्याची कामगिरी पाहता. त्याची गोलंदाजी देखील संघासाठी उपयुक्त अशी आहे. शुभमन शेवटच्या वेळी टी-२० क्रिकेट खेळला होता तेव्हा तो संघाचा उपकर्णधार होता. हे सर्व गेल्या विश्वचषकानंतर घडले होते.’
शुभमन गिल थेट अंतिम इलेव्हनमध्ये परतेल की नाही यावर आगरकर बोलताना म्हणाले, “संघासाठी सर्वोत्तम संतुलन कसे आहे याचा निर्णय कर्णधार आणि प्रशिक्षक घेणार आहेत. दुबईला पोहोचल्यानंतर आम्हाला याबाबत अधिक माहितीची स्पष्टता येईल. सध्या इतर पर्याय उपलब्ध आहेत. शुभमन गेल्या काही महिन्यांपासून चांगल्या लयीत आहे. संजू देखील चांगली कामगिरी करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत अभिषेकसोबत दोन चांगले पर्याय उपलब्ध आहेत.’
आशिया कप २०२५ ला ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. टीम इंडिया १० सप्टेंबरला आपला सलामी सामना यूएईविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना बघायला मिळणार आहे. १९ सप्टेंबर रोजी टीम इंडिया ओमानविरुद्ध खेळणार आहे.
आशिया कपसाठी भारतीय संघ खालीलप्रमाणे
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), हर्षित राणा आणि रिंकू सिंग.