सौजन्य - नवराष्ट्र टीम
रिजवान उर्फ टिपु सत्तार पठाण मुळचा लोणी काळभोरचा. पठाण कुटूंब काही वर्षांपुर्वी उदरनिर्वाह करण्यासाठी वानवडी येथील सय्यदनगरमध्ये आले. पण, २०१३ मध्ये टिपू पठाण व त्याच्या मित्रांनी एकाचा खून केला. याप्रकरणात हडपसर पोलिसांकडे गुन्हा नोंद झाल्यानंतर टिपू पठाण गुन्हेगारी जगतात आला. तोपर्यंत टिपू पठाण कोण असा प्रश्न होता. पण, एका खूनानंतर टिपू पठाण या भागातील भाई झाला. पाहता पाहता, त्याने गुन्हेगारांसोबत एक टोळी निर्माण केली आणि तो या टोळीचा प्रमुख देखील झाला.
१३ गुन्ह्यांची नोंद
टिपू पठाणने खूनानंतर बंडगार्डन, हडपसर, वावनडी, सातारा शहर व ग्रामीण भागात देखील गुन्हे केले. मारामाऱ्या, खूनाचे प्रयत्न आणि खंडणी अशा वेगवेगळ्या प्रकरणात त्याच्यावर व टोळीवर १३ गुन्हे दाखल झाले. तोपर्यंत टिपू पठाण याचे नाव गुन्हेगारी जगतात मोठे झाले होते.
गोळीबार अन् मोक्का कारवाई
वानवडी, हडपसर, कोंढवा तसेच काळेपडळ भागात दहशत असणाऱ्या टिपू पठाण व त्याच्या टोळीने आर्थिक वादातून एकावर २०१९ मध्ये गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात तरुण बचावला, पण याप्रकरणात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला व पहिली मोक्का कारवाई टिपू पठाण टोळीवर झाली. परंतु, वानवडी पोलिसांकडे दाखल असलेल्या या गुन्ह्यातून टिपू पठाण व त्याच्या टोळीची २०२२ मध्ये निर्दोश मुक्तता झाली. त्यानंतर तो बाहेर आला.
मोक्काचा शिक्का अन् दहशत
पोलिसांच्या मोक्का कारवाईचे लेबल एखाद्या गुन्हेगाराला लागल्यानंतर त्याची दहशत कमी होण्यापेक्षा वाढतच जाते, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. तशी टिपू पठाणची देखील या भागात दहशत वाढत गेली. त्याने या दहशतीच्या जोरावर जमीन बळकावण्याचे काम सुरू केले. व्याजाचा धंदा अन् खंडणी यामाध्यातून गुन्हेगारी सुरू ठेवली. पोलिसांच्या मते त्याची दहशत इतकी होती की तक्रार करण्यास देखील पुढे कोणी येत नसत.
टिपू पठाण कारागृहात
एका महिलेच्या जमीन ताबा प्रकरणात गुन्हा नोंदवल्यानंतर पुणे पोलिसांनी टिपू पठाण व त्याच्या टोळीवर मोक्का कारवाई केली. टिपू पठाणसह त्याच्या टोळीतील साथीदारांना अटक केली. सध्या टिपू पठाणसह टोळी कारागृहात आहे.
एकाचा एन्काऊंटर
टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई झाल्यानंतर त्यातील ८ जण फरार होते. त्यांचा शोध सुरू होता. तेव्हा गुंड शाहरूख उर्फ अट्टी रहीम शेख हा मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात असल्याच्या माहितीवरून पुणे पोलिस त्याला पकडण्यास गेले होते. तेव्हा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत शाहरूख याचा एन्काऊंटर झाला होता. पोलिसांच्या या एन्काऊंटरनंतर गुडांच्या मनात धडकी भरली होती.
टिपूप्रमाणेच विस्तारत चालेल्या सिंहगड रोड भागात बंटी उर्फ महेश पवार याची टोळी देखील पोलिसांच्या नोंदीत आहे. या टोळीचे वैशिष्ट्य देखील प्रतिस्पर्धी टोळी नाही. पण, बंटी पवार टोळीत २९ सदस्य आहेत. बंटी पवार मुळचा वडगाव भागातील. पण, रहिवास हिंगण्यातील तुकाईनगर भागात. बंटी पवार याचा भाऊ गुन्हेगार होता. पण त्याचा मृत्यू झाल्यानंतर बंटी पवार हा गुन्हेगारीत आला. त्याने स्वतची टोळी निर्माण केली. खून, मारामाऱ्या, दरोडा असे गुन्हे दाखल असलेल्या बंटी पवार याची सिंहगड रोड परिसरात दहशत आहे. २०२१ पासून बंटी पवार एनडीपीएसच्या गुन्ह्यात कारागृहात आहे.






