अल्पवयीनवर शिक्षकाचा अत्याचार
चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता चंद्रपुरात एक संतापजनक घटना घडली. एक शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी नराधम शिक्षकावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
दिलीप दादाजी मडावी (वय ५३) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पीडित मुलगी राजुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत पाच वर्षांपूर्वी इयत्ता सहावीत शिकत होती. आरोपी शिक्षक मडावीसुद्धा तिथेच कार्यरत होता. पीडित मुलगी हुशार असल्याने तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला उच्च शिक्षणासाठी चंद्रपूरला पाठवावे, असा सल्ला त्याने मुलीच्या आई-वडिलांना दिला. त्यानुसार, गेल्या वर्षी पीडिता चंद्रपूरात शिक्षणासाठी आली.
दरम्यान, त्या मुलीचे आई-वडील काही आवश्यक साहित्य त्या शिक्षकाकडे पाठवायचे. तेव्हा नराधम शिक्षक तिच्या रुमखाली जाऊन त्या मुलीला घरगुती सामान देण्याच्या बहाण्याने आपल्या गाडीत बसवून तिचे शोषण करायचा. मात्र, बदनामीच्या भीतीने पीडितेने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. २० नोव्हेंबरला ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवल्यानंतर आरोपी शिक्षकाला अटक केली.
बीडमध्येही अत्याचाराची घटना समोर
बीड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. साडेपाच वर्षीय चिमुरडीवर नात्यातीलच एका मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे गावकऱ्यांनी बदनामीच्या भीतीने पीडितेच्या आईवर गुन्हा दडपण्याचा दबाव आणल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.






