किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने सपासप वार; सर्व मित्र पिकनिकसाठी गेले अन् अचानकच... (संग्रहित फोटो)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता नागपुरात एक संतापजनक घटना घडली. मित्रांसोबत पिकनिकसाठी आलेल्या तरुणाचा लायटरवरून वाद झाला. याच वादातून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. अज्ञात आरोपींनी चाकूने सपासप भोसकून त्याचा जीव घेतला. तसेच एकजण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे.
आशिष रोशन गोंडाणे (वय ३३, रा. पिवळी नदी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी जखमी सुशीलकुमार मोतिराम गेडामच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला. अद्याप आरोपींचा सुगावा लागलेला नाही. खापरखेडा पोलिस ठाण्यांतर्गत बिनासंगम नदी घाट परिसरात रविवारी सायंकाळी ही घटना घडली. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने आशिष व त्याचे मित्र सुशील आणि सचिन पुनीमहेश मिश्रा यांनी पिकनिकसाठी बिनासंगम नदी घाटावर जाण्याची योजना आखली. दुपारी दोनच्या सुमारास तिघेही परिसरात पोहोचले.
हेदेखील वाचा : Solapur Crime: बार्शी सत्र न्यायालयाचा निर्णय, उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी नर्तिका पूजा गायकवाडला जामीन
आसपासच्या परिसराचा आनंद घेतल्यानंतर सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास काही काम असल्याने सचिन तेथून निघून गेला. त्यानंतर आशिष व सुशील नदीत पोहायला उतरले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोहून झाल्यानंतर दोघेही परत जाण्यासाठी निघाले असता ४ ते ५ अनोळखी मुले त्यांच्याजवळ आली. एकाने सिगारेट पेटवण्यासाठी त्यांना लायटर मागितले.
लायटर परत मागितले अन् राडा झाला
सिगारेट पेटवल्यानंतर आशिषने लायटर परत मागितले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत वाद घातला. हा वाद चिघळला आणि आरोपींपैकी एकाने अचानक चाकू काढून आशिषच्या छाती व पोटावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. सुशीलने मध्यस्थीचा प्रयत्न केला असता दुसऱ्या आरोपीने पाठीवर चाकूने वार करून त्यालाही गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले.
आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक केले तयार
सुशीलने सचिन आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. खापरखेडा पोलिस घटनास्थळी पोहोचले. दोघांनाही उपचारार्थ कामठीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून आशिषला मृत घोषित केले तर सुशीलला प्राथमिक उपचारानंतर त्याच्या कुटुंबीयांनी मानकापूर परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले.






