Baramati Crime News, Tadi Vikri, Baramati Police, बारामतीत ताडी विक्री करणाऱ्या दोघांना अटक
२५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना, पोलिसांना झारगडवाडीत बेकायदेशीर ताडी विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता, चिन्नया दत्तु गुत्तेदार (वय ३२) हा घराच्या आडोशाला ताडी विकताना रंगेहात सापडला. त्याच्याकडून ३० लिटर ताडी जप्त करण्यात आली. तसेच घराची झडती घेतली असता, ताडीमध्ये मिसळली जाणारी ‘क्लोरोहायड्रेट’ ही अत्यंत धोकादायक रासायनिक पावडरही मिळून आली.
राज्यातील रस्त्यांवर वाढतीये वाहनांची संख्या; फक्त एका वर्षात झाली तब्बल ‘इतक्या’ लाख वाहनांची नोंद
चौकशीत आरोपीने ही रासायनिक पावडर ताडीमध्ये मिसळून ताडी तयार करत असल्याची कबुली दिली. तसेच सदरची ताडी व रासायनिक पावडर बाबु भंडारी (रा.सणसर ता.इंदापूर) याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. त्यास सुद्धा ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, विषारी ताडीचा नमुना रासायनिक तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. उर्वरित विषारी ताडी घटनास्थळीच नष्ट करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मनोज पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी चिन्नया गुत्तेदार व बाबु भंडारी यांच्याविरुद्ध बी.एन.एस. कलम १२३ (दहा वर्षे शिक्षा) तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ख)(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम पोलीस अमलदार मनोज पवार सौरभ तुपे सुरेंद्र वाघ भारत खारतोडे जितेंद्र शिंदे दादा दराडे आफ्रिन शेख यांनी केली आहे.






