वसई विरारमध्ये आणखी एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, आठवडाभरातील तिसरी घटना
रवींद्र माने, वसई : कोलकाता आणि बदलापूर प्रकरणाचे तीव्र पडसाद मुंबईसह राज्यभर उमटताहेत. अत्याचाराच्या घटना वाढत असून घृणास्पद कृत करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती राहिली नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या नराधमांना कायद्याची भीती नसल्यामुळं, ते असं राक्षसी कृत्य करण्यास धजवत आहेत, असं संतप्त नागरिकांचं म्हणणे आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये बलात्कार, लैगिंक अत्याच्याराच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होतानाचं भयावह चित्र आहे. अशातच आज (28 ऑगस्ट) पुन्हा शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याची आणखी एक घटना विरारमध्ये घडली असून गेल्या आठवडाभरातील ही तिसरी घटना उघड झाल्यामुळे पालक आणि विद्यार्थी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.
हे सुद्धा वाचा: पुन्हा अत्याचार ! जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीला नराधमाने खोलीत नेलं अन्…
नालासोपारा पूर्वेकडील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच नायगाव येथील एका शाळेतील सात वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेतील कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या १७ वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. या दोन घटना ताज्या असतानाच आता विरारमध्ये या घटनेची पुनरावृत्ती झाल्याची माहिती मिळत आहे.
विरार पूर्वेकडील मनवेल पाड्याच्या सह्याद्री नगरमध्ये प्रमोद मौर्या नावाचा शिक्षक खासगी ट्युशन क्लास चालवतो. या क्लासमध्ये शिकणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा मोर्या ने मागील आठवड्यात लैंगिक अत्याचार केला होता. या भितीने ती अल्पवयीन मुलगी २ दिवस ट्युशनला गेली नाही. त्यामुळे ट्युशनला का जात नाही असा तिच्या कुटुंबीयांनी प्रश्न विचारल्यावर तिने झाला प्रकार सर्व कुटुंबियांना सांगितला. हा प्रकार समजल्यावर बुधवारी सकाळी मुलीचे पालक आणि परिसरातील संतप्त नागरिक ट्युशनमध्ये गेले. त्यांनी मोर्याला मारहाण करून त्याची धिंड काढली.
हे सुद्धा वाचा: धक्कादायक ! आतेभावानेच केला अल्पवयीन बहिणीवर अत्याचार; घरात कोणीही नसल्याची संधी साधली अन्…
यथेच्छ धुलाई केल्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेय या शिक्षकाने ३ ते ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप यावेळी संतप्त नागरिकांनी केला. मुलांना शिक्षकांकडे शिकविण्यासाठी विश्वासने पाठवतो परंतु ते असा घृणास्पद प्रकार करत असल्यामुळे आम्ही करायचे काय? असा चिंतीत प्रश्न पालकांनी यावेळी उपस्थित केला.
नागरिकांनी आरोपी शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याने मुलीची छेड काढून लैंगिक छळ केल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. तिचा जबाब नोंदवत असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे विजय पवार यांनी दिली.