दिशा सालीयन प्रकरणाची सुत्रे आता बड्या महिला अधिकाऱ्याकडे
या प्रकरणाशी संबंधित सर्वात मोठे अपडेट समोर आले आहे. देशातील अनेक अत्यंत संवेदनशील आणि हाय-प्रोफाईल प्रकरणे सोडवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सीबीआयच्या वरिष्ठ आणि धाडसी अधिकारी सीमा पाहुजा यांना या तपासावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे.
Manoj Jarange Patil Ahilyanagar Visit : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; आज श्रीगोंद्यात मुक्काम!
सीबीआयने गुन्हा दाखल केल्यापासून, या हाय-प्रोफाईल प्रकरणाचे नेतृत्व करण्यासाठी एका अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल अशी जोरदार चर्चा होती. आता सीमा पाहुजा यांचे नाव निश्चित झाल्याने तपासाला गती मिळाली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या प्राथमिक एफआयआरमध्ये कोणालाही आरोपी म्हणून नाव देण्यात आलेले नाही.
सीमा पाहुजा सध्या नवी दिल्ली येथील सीबीआय मुख्यालयातील विशेष गुन्हे शाखेत पोलीस अधीक्षक (एसपी) म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी सीबीआयच्या चंदीगड युनिटमध्ये सेवा बजावली आहे. आपल्या प्रदीर्घ आणि निष्पक्ष कारकिर्दीत, त्यांनी संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी अनेक गुंतागुंतीची गुन्हेगारी प्रकरणे सोडवली आहेत.
सीमा पाहुजा यांनी उन्नाव बलात्कार प्रकरण, हाथरस प्रकरण आणि पश्चिम बंगालमधील कोलकाता आर. जी. कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलशी संबंधित बलात्कार-हत्या प्रकरणाचा तपास हाताळला आहे. शिमला येथील कुप्रसिद्ध ‘गुडीया’ बलात्कार-हत्या प्रकरणाच्या तपासातही त्यांनी भूमिका बजावली होती. शिमला प्रकरणाच्या तपासादरम्यान आधुनिक न्यायवैद्यक तंत्रांचा वापर केल्याबद्दल त्यांच्या टीमचे कौतुकही झाले होते.
सीमा पाहुजा या गुन्हे अन्वेषण क्षेत्रातील त्यांच्या अपवादात्मक क्षमतेसाठी, सूक्ष्म निरीक्षणशक्तीसाठी आणि आधुनिक न्यायवैद्यक तंत्रांच्या अचूक वापरासाठी ओळखल्या जातात. २०२१ मध्ये, त्यांच्या उत्कृष्ट तपास कामगिरीबद्दल त्यांना देशातील प्रतिष्ठित ‘सर्वोत्कृष्ट तपास अधिकारी’ सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.
दिशा सालियनच्या मृत्यूला सहा वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. इतका काळ लोटल्यामुळे, या प्रकरणात तपास यंत्रणेसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे जुन्या पुराव्यांची सत्यता पडताळणे, घटनांचा अचूक ताळमेळ घालणे आणि साक्षीदारांच्या जबाबांमधील विसंगती ओळखणे हे असेल.
एफआयआरमध्ये विविध दावे आणि आरोप नमूद असले तरी, मुंबई उच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांनुसार, एफआयआरमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही गोष्टीच्या आधारावर कोणालाही आपोआप आरोपी मानले जाऊ शकत नाही.
सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान जसे ठोस आणि वैज्ञानिक पुरावे समोर येतील, त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई आणि अटकेचा निर्णय घेतला जाईल. पोलीस अधीक्षक सीमा पाहुजा यांच्या सक्षम नेतृत्वाखालील सीबीआयचा तपास कोणती दिशा घेतो आणि हे अनेक वर्षांपासूनचे गूढ उकलले जाते की नाही, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.






