दिवाळीपूर्वी दिल्लीत CRPF च्या शाळेबाहेर स्फोट (फोटो सौजन्य-X)
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत दिवाळीपूर्वीच बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. याघटनेनंतर दिल्ली पोलीस आणि इतर तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. दिल्लीतील रोहिणी जिल्ह्यातील प्रशांत विहार भागात असलेल्या CRPF शाळेजवळ आज (20 ऑक्टोबर) सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना सकाळी ७.४७ वाजता घटनेची माहिती मिळाली. पीसीआर कॉलद्वारे सीआरपीएफ शाळेजवळ मोठा स्फोट झाल्याचे समोर आले. यानंतर एसएचओ आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.
एनएसजी कमांडोंनीही घटनास्थळी पोझिशन घेतली आहे. या घटनेसंदर्भात एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, स्फोटानंतर सुमारे 200-250 मीटरपर्यंत फक्त धूर दिसत होता. वास खूप होता. वाहनांच्या काचा, दुकानांच्या नावाच्या पाट्याही फोडल्या. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटामुळे शाळेच्या भिंतीला तडे गेले असून, आजूबाजूला दुर्गंधी पसरली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्फोटामुळे जवळच्या दुकानाच्या काचा आणि तिथे उभ्या असलेल्या कारचेही नुकसान झाले. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही ही दिलासादायक बाब आहे. घटनास्थळी क्राईम टीम, फॉरेन्सिक टीम आणि बॉम्ब निकामी पथक स्फोटाचा तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळाची नाकेबंदी करण्यात आली असून अग्निशमन दलाची एक टीमही हजर आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात सीआरपीएफ शाळेच्या हद्दीत स्फोट झाल्याची माहिती मिळाल्यानंतर खळबळ उडाली. हा कोणत्या प्रकारचा स्फोट होता याचा दिल्ली पोलिसांचे पथक पूर्ण तपास करत आहे. मीडियाला माहिती देताना डीसीपी रोहिणी अमित गोयल यांनी सांगितले की, तपासासाठी एक टीम घटनास्थळी पोहोचली आहे, जे या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत. या प्रकरणाला दुजोरा देताना अग्निशमन संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, नियंत्रण कक्षाला सकाळी 7.50 वाजता कॉल आला होता.