सौजन्य - नवराष्ट्र टीम
अक्षदा रणदिवे म्हणाल्या, “गेल्या वर्षभरापासून माझे पती निखिल प्रचंड मानसिक तणावात होते. सुट्टी मिळत नव्हती. ड्युटीवरून आले तरी लगेच दुसऱ्या ठिकाणी रवाना करण्याचे आदेश मिळत. मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचा त्यांनी शब्द दिला होता, पण त्याच दिवशी बाहेरगावी ड्युटी लावण्यात आली.” त्यांनी पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सतत त्रास दिल्याचा आरोप केला आहे.
तपासात विलंबाची चर्चा
तीन दिवस उलटूनही अद्याप तपासात कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप रणदिवे यांच्या कुटुंबीयांनी व सहकाऱ्यांनी केला आहे. शनिवारी अक्षदा रणदिवे आपल्या दोन लहान मुलांसहित यवत पोलीस ठाण्यात आल्या. मात्र, त्या वेळी वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित होते. फक्त “तपास सुरू आहे” एवढेच उत्तर उपविभागीय अधिकारी दडस यांनी दिले.
बदली असूनही यवतला रोखल्याचा आरोप
रणदिवे यांची काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती. मात्र, अपूर्ण कामाचे कारण सांगून त्यांना यवत ठाण्यातच थांबवण्यात आले. इतर कर्मचाऱ्यांना मात्र तत्काळ रिलीव्हिंग देण्यात आले, असं सहकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
पोलिस दलात संतापाचा उद्रेक
या घटनेनंतर ग्रामीण पोलीस दलात असंतोष पसरला असून, मागासवर्गीय कर्मचारी यामध्ये जास्त अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. वंचित बहुजन आघाडी आणि इतर मागासवर्गीय संघटनांनी आंदोलनाची चेतावणी दिली आहे. संघटनेचे कार्यकर्ते रोहित गजरमळे आणि प्रथमेश गायकवाड यांनी, “तपासात पक्षपात होत आहे. निखिल रणदिवे हे छळाचे बळी आहेत. न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल,” असा इशारा दिला.






