सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये आठ जण जखमी झाले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. या जीवितहानीबरोबरच मोठी वित्तहानीदेखील झाली आहे. या ठिकाणी असलेली अनेक वाहने या छताखाली दबली गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. मुसळधार पावसात टर्मिनल 1 च्या छताचा काही भाग कोसळला. हे छत कोसळल्याने अनेक गाड्या त्याखाली दबल्या गेल्या. त्यात एकाचा मृत्यू झाला असून, अनेक लोक जखमी झाले आहेत. यातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर विमानतळाच्या टर्मिनलबाहेर मोठी वाहतूककोंडी झाली होती. त्यानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. टर्मिनलचे छत कसे कोसळले याचा पोलीस तपास करत आहेत. टर्मिनल 1 वरून सुटणाऱ्या सर्व फ्लाईट रद्द करण्यात आल्या आहेत. तेथील चेक-इन काउंटरही सध्या बंद करण्यात आले आहे.
अनेक उड्डाणे रद्द
मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीपासून आत्तापर्यंत उड्डाण करणाऱ्या १६ फ्लाईट रद्द करण्यात आल्या आहेत. तर विमानतळावर परत येणाऱ्या १२ फ्लाईट रद्द केल्या गेल्या आहेत. ‘इंडिगो’ आणि ‘स्पाईसजेट’ सारख्या मोठ्या विमान कंपन्यांची विमाने देखील रद्द करण्यात आली आहेत. इंडिगो कंपनीने म्हटले की, ‘खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल १ चे नुकसान झाले आणि त्यामुळे इंडिगोच्या अनेक फ्लाईट रद्द करण्यात आलेल्या आहेत.’ या दुर्घटनेमुळे प्रवाशांचे नुकसान झाले असून अनेकांनी त्याबद्दल नाराजी दाखवली आहे.
दिल्लीमध्ये आणखी मुसळधार पावसाची शक्यता
दिल्लीमध्ये आज पहाटेपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. आयएमडीने पुढील सात दिवस दिल्लीमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. दिल्लीत आज कमाल तापमान ३६ अंश सेलसिअस तर किमान तापमान २८ अंश सेलसिअस असेल.