मुंबई : कोरोना (Corona) महामारीमुळे देशात लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला होता. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांवर मोठा परिणाम झाला. तसेच, परीक्षांचे वेळापत्रक (Exam Timetable) कोलमडले. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ उशीरा सुरु झाल्याने परीक्षा उशीरा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती.
मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा (Winter Session Exam) या दिवाळीनंतर घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर परीक्षा तयारीसाठी कमी वेळ मिळाला. या कारणामुळे विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या आधी परीक्षा घेण्यासाठी विरोध दर्शवला होता. त्यानंतर आता सुधारित परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
मुंबई विद्यापीठाकडून २०२२ चे पहिल्या सत्र म्हणजे, हिवाळी सत्र परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षा ४ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु होणार आहेत. यातील २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या तृतीय वर्ष बी.ए आणि बी.एस्सी सत्र ५ च्या परीक्षा या ४ नोव्हेंबर, तर तिसऱ्या वर्षातील बी.कॉम सत्र ५ ची परीक्षा १८ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु होत आहेत. हिवाळी सत्राच्या सर्व शाखेच्या नियमित आणि बॅकलॉगच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.