संजू सॅमसन(फोटो-सोशल मीडिया)
चेन्नई सुपर किंग्जने रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांच्या बदल्यात राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसनला खरेदी केले. या मोठ्या बदलानंतर, क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा होती की, सीएसके संजू सॅमसनकडे कर्णधारपदाची धुरा सोपवेल. परंतु, असे काही एक होऊ शकले नाही. संजू सॅमसनने २०२१ ते २०२४ पर्यंत राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले आहे. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली संघ आयपीएल २०२२ च्या अंतिम फेरीत पोहोचला होता. परंतु, त्याच्या संघाला गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. परिणामी, असे मानले जात होते की सीएसके संघ त्यांच्या नवीन रणनीतीचा भाग म्हणून त्याला कर्णधारपदाची धुरा सोपवू शकतो.
मागील हंगामात, दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाडला स्पर्धेतून बाहेर जावे लागले होते. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने संघाचे नेतृत्व केले होते. धोनीचे वय पाहता, संजू सॅमसनला कर्णधारपद दिले जाण्याची शक्यता होती असे मानले जात होते. पण आता, सीएसकेने आयपीएल २०२६ साठी ऋतुराज गायकवाडला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. फ्रँचायझीने त्याच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.
ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत एकूण १९ सामन्यांमध्ये सीएसकेचे नेतृत्व केले आहे. यापैकी आठ सामने संघाने जिंकले तर ११ सामने गमवावे लागले. तथापि, त्याची नेतृत्वशैली शांत आणि धोरणात्मक मानली जाते आणि कायमस्वरूपी जबाबदारी स्वीकारल्यानंतर तो चांगली कामगिरी करेल अशी फ्रँचायझीला अपेक्षा आहे.
हेही वाचा : वैभव सूर्यवंशीच्या सिक्स हिटिंगचे गूढ काय? त्याचा सामना करायला गोलंदाज घाबरतात; वाचा सविस्तर
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली, चेन्नई सुपर किंग्जने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले असले तरी आयपीएल २०२५ चा हंगाम संघासाठी निराशाजनक राहिला होता. संघाने १४ पैकी फक्त चार सामने जिंकले आणि दहा सामने गमावले होते.






