Photo Credit- Social Media
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा सोमवारी (दि.18) संध्याकाळी सहा वाजता थंडावल्या. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यातील 288 विधानसभेच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यात आता बुधवारी (दि.20) सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल शनिवारी (दि.23) जाहीर केला जाणार आहे. तेव्हाच राज्यात नेमकं कोणाचं सरकार येणार हे समजणार आहे.
संबंधित बातम्या : “५० खोकेवाल्या गद्दारांना विधानसभा निवडणुकीत…”; मल्लिकार्जून खर्गेंची महायुतीवर टीका
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकूण 4,136 उमेदवार रिंगणात आहेत, जे 2019 च्या तुलनेत 27.7 टक्के जास्त आहेत. यामध्ये 2,086 अपक्ष उमेदवार आहेत. 2019 मध्ये एकूण 3,239 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 5 ते 13 नोव्हेंबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांसारख्या दिग्गज नेतेमंडळींच्या प्रचारसभा झाल्या.
त्यात पंतप्रधान मोदी असो की शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांच्या सभाही चांगल्याच गाजल्या. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही शिर्डी आणि कोल्हापुरात सभा घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर आता छुपा पद्धतीने ‘प्रचार’ होईल, असे म्हटले जात आहे. अशा स्थितीत हे प्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाची भरारी पथके पूर्णपणे सक्रिय झाली आहेत. जेणेकरून मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देता येणार नाही.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून अनेक पक्षांकडून सभांचा धडाका
निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासूनच महायुती असो वा महाविकास आघाडी यांच्या घटकपक्षांकडून ही निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार, अनेक राजकीय पक्षातील दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या. सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात होता. सर्व पक्षांनी आपल्या उमेदवारासाठी मैदानात उतरून जोरदार प्रचार केला. रॅली, सभा, घोंगडी बैठका, कोपरा सभा, बाईक रॅली, घरोघरी भेटी आदींमुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले होते. त्यानंतर मात्र, आता दोन्ही बाजूकडून गुप्त बैठका, राजकीय डावपेच पाहिला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.