File Photo : balasaheb-patil
कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी केलेले काम जनतेसमोर आहे. विकासकामे व जनसंपर्काच्या जोरावर आपण समाजकारण, राजकारण केले. अशा परिस्थितीत राज्याचे चित्र पाहता महायुतीचे आमदार एवढ्या मताधिक्याने निवडून येतील, अशी परिस्थिती नव्हती. महाराष्ट्राच्या सर्व भागात राहिलेला ट्रेंड सातारा जिल्ह्यातही राहिला आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Election Result 2024 : फडशा पडला पण तो मविआचा; निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय?
कराड उत्तरसह सातारा जिल्हा आणि एकूणच राज्यभरात लागलेल्या निकाल हा नक्कीच सर्वांसाठी अनपेक्षित असल्याचे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त सांगितले. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि एकूणच राज्यभरातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. ईव्हीएम मशीनचा निकाल शंकास्पद वाटतो का? या प्रश्नावर बोलताना पाटील म्हणाले, ईव्हीएम मशीनबाबत संशय निश्चितच आहे. अनेकवेळा यावर चर्चाही झाली आहे. कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे.
मतदानादिवशी मतदारसंघात फिरत असताना बुथवरील कार्यकर्त्यांचा उत्साह समोरच्या बाजूला दिसत नव्हता. परंतु, पराभव हा पराभव असतो. त्याचे खापर कोणावरही फोडण्यासारखी परिस्थिती नाही. ईव्हीएमबाबतच्या न्यायालयीन लढाईबाबत महाविकास आघाडीतील वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही यावर वक्तव्य केल्याचे त्यांनी सांगितले.
जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही
गेले अनेक वर्ष कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ तसेच सातारा जिल्ह्यात समाजकारण राजकारणाच्या माध्यमातून काम केले. शरद पवार साहेबांनी काम करण्याची संधी दिली. करडाच्या जनतेनेही चांगली साथ दिली. दरम्यानच्या काळात ठाकरे सरकार गेल्यावरही अडीच वर्षे चांगले काम केले. कोरोना कालावधीतही कार्यरत राहिलो.
पदाधिकाऱ्यांनीही माझ्यावर विश्वास ठेवला
मतदारसंघातील नेते, पदाधिकाऱ्यांनीही माझ्यावर विश्वास ठेवला. परंतु, ही लोकशाही असून, जनतेने दिलेला निकाल आपल्याला मान्य आहे. त्यामुळे मला आत्तापर्यंत साथ दिलेल्या जनतेला आपण कधीही वाऱ्यावर सोडणार नसून आगामी काळातही समाजकारण, राजकारणाच्या माध्यमातून आपण आविरतपणे त्यांची सेवा करत राहणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : Maharashtra Election 2024: महायुतीच्या वादळात महाविकास आघाडीची वाताहत; ‘या’ मातब्बर नेत्यांना बसला धक्का