File Photo : Manoj Jarange
जालना : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची धामधुम आता संपली आहे. प्रचंड विजयानंतर महायुती उद्या (दि.25) राज्यामध्ये सरकार स्थापन करणार आहे. भाजपने 133 जागांवर विक्रमी विजय मिळवून धुव्वाधार विजय मिळवला. 234 जागा महायुतीला मिळाल्या आहेत. यंदाची निवडणूक ही अतीतटीची व प्रतिष्ठेची होणार असल्याचे बोलले जात होते. महायुतीच्या एकतर्फी विजयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. यावर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, “एक महिन्याभर थांबा ,तुम्हाला मराठ्यांची ताकद कळेल. या निवडणुकीत मराठ्यांचे 204 आमदार झाले. मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणीही सत्तेत येऊ शकत नाहीत. आम्ही मैदानात असतो तर मराठ्यांनी एक शिक्का काम केलं असतं. पण आम्ही सांगितलं होत मराठा समाजाला जे करायचं ते करा. मी दोघांचेही अभिनंदन करतो निवडून येणाऱ्याचही आणि एक पडणाऱ्याचंही… मराठ्यांच्या फॅक्टरला बघूनच यांनी मराठ्यांना तिकीट दिले ना” असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यंदाच्या निवड़णुकीमध्ये मनोज जरांगे पाटील हे महत्त्वाची भूमिका बजावतील असे वाटत होते. मात्र ऐन वेळी निवडणुकीच्या पूर्वी जरांगे पाटील यांनी माघार घेतली. यामुळे जरांगे पाटील यांचा फारसा काही परिणाम निवडणुकीवर झाला नसून जरांगे पाटील फॅक्टर फेल झाल्याची चर्चा होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील म्हणाले की, “अरे आम्ही मैदानातच नाहीत. तरी तुम्ही आम्हाला फेल झाला म्हणता. कोण निवडून आला काय आणि कोण पडला काय…, याचं आम्हाला काही सोयरं सुतकच नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. तुम्ही गोड बोलून मराठ्यांची मतं घेतली. पण ठीक आहे, उद्या आमचा आहे,” असा घणाघात जरांगे पाटील यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
निवडणुकीच्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी दीड वर्षे आंदोलन केले. यावेळी जरांगे पाटील विरुद्ध मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये अनेकदा वादंग झाला. छगन भुजबळ यांच्या विजयावर जरांगे पाटील म्हणाले की, “जेवढे लोक निवडून आलेत ना… त्यांच्या मागे मराठा फॅक्टर आहे. एखाद्या आमदाराने म्हणावं की तो मराठ्यांच्या जीवावर निवडून आला नाही. जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमची सगळी हयात जाईल. तरी तुम्हाला कळणार नाही. तुम्ही मराठ्यांच्या कशाला नादी लागता. मराठाच मैदानात नाही आणि काही बांडगुळं बोलत बसतेत. जरांगे फॅक्टर फेल झाला म्हणतेत. अरे पण आम्ही मैदानातच नाही,” असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.