महाविकास आघाडीला महाराष्ट्रात सेटबॅक (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: विधानसभा निवडणुकीत पुणे, साेलापूर, अिहल्यानगर जिल्ह्यात मात्तबर नेत्यांना धक्का बसला. महायुतीने तिन्ही जिल्ह्यात जाेरदार मुसंडी मारताना महाविकास आघाडीची वाताहत केली. संगमनेरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थाेरात, सांगाेल्यात शहाजी पाटील (बापू), बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार, इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पराभूत झाले.
पुणे, साेलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात एकेकाळी कॉँग्रेसचे एकहाती वर्चस्व हाेेते. २०१४ पासून कॉँग्रेसचे बुरुज ढासळू लागले. नुकत्याच झालेल्या लाेकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला बॅकफूटवर नेत उल्लेखनीय कामगिरी केली. हाच ट्रेंड विधानसभा निवडणुकीत राहील, असा हाेरा हाेता. मात्र निकालाने सर्वांचे अंदाज धुळीस मिळविले.निवडणुकीत व निवडणुकीपूर्वी तुतारीचा बाेलबाला राहिला. महायुती व महाविकास आघाडीतील अनेकांनी तुतारी हाती घेतली मात्र, निकालात शरद पवार गटाची माेठी पिछेहाट झाल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना आहे त्या जागाही राखता आल्या नाहीत.
पारनेरमध्ये खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार राणी लंके यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काशिनाथ दाते यांनी लंके यांचा पराभूत केले. ‘लाेकसभेत जिंकले, विधानसभेत हरले’, अशी लंकेची अवस्था झाली. पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघातील लढतीकडे देशभरातील राजकीय पंडिताच्या नजरा लागल्या हाेत्या. या मतदारसंघात शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांना व उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यात सामना झाला. यात अजित पवार यांनी माेठ्या फरकाने युगेंद्र पवार याच्यांवर मात केली.
बारामतीत ‘थाेरले साहेब’ चमत्कार घडविणार का, याची उत्सुकता हाेती. मात्र अजित पवारांनी सहजगत्या हा सामना जिंकला. इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निवडणुकीच्या ताेंडावर भाजपला साेडचिठ्ठी देत तुतारी फुंकली. मात्र राष्ट्रवादीतील बंडाळीचा पाटील यांना फटका बसला. आणि दत्तात्रय भरणे पुन्हा विधानसभेत पाेहचले. काेथरुडमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दुसऱ्यांदाविजयी झाले. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत माेकाटे यांना अस्मान दाखविले. मनसेचे किशाेर शिंदे तिसऱ्या क्रमांकावर गेले. शिवसेनेचा प्रभाव राहिलेला हा मतदारसंघ भाजपने गेल्या तीन निवडणुकांत आपल्या प्रभावाखाली आणले आहेत.
साेलापूरमध्ये प्रमुख शिलेदार गारद
साेलापूर जिल्ह्यात सांगाेला मतदार संघात शिंदे गटाचे अामदार शहाजी पाटील यांचा शेकापचे बाबासाहेब देशमुख यांनी पराभव केला. पाटील यांच्या पराभवाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडातील एक शिलेदार चितपट झाला. या मतदारसंघात धनगर समाजाची माेठी मते अाहेत. देशमुख यांना शरद पवार गटाची साथ व धनगर समाजाची हात कामी आला. करमाळ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नारायण पाटील यांनी विधानसभेत कमबॅक करताना आमदार संजय शिंदे (मामा) यांची वाट राेखली. माजी आमदार दिंगबर बागल यांचे पुत्र िदग्विजय बागल यांचीही निराशा झाली. माेहिते पाटील गटाचे पाठबळ व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे सहकार्य नारायण पाटील यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरले. बार्शीत माजी मंत्री दिलीप साेपल यांनी आमदार राजेंद्र राऊत यांचा पराभूत केले. येथे जरांगे फॅक्टरचा राऊत यांना फटका बसला. लाडकी बहिण याेजना, महायुतीच्या नेत्यांचे मॅनेजमेंट, वाढलेली मते निकाल फिरविणारी ठरली.
मुख्यमंत्री पदाचा दावेदार चितपट
अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये कांॅग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार बाळासाहेब थाेरात यांचा यांचा अनपेक्षित पराभव झाला. शिवसेना शिंदे गटाचे अमाेल खताळ ‘जायंटकिलर’ ठरले. या जिल्ह्यात थाेरात व विखे पाटील राजकारणातील मातब्बर घराणी आहेत. या दाेन नेत्यांतील राजकीय ‘सख्य’ सर्वश्रूत आहे. माजी मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील, बाळासाहेब थाेरात यांनी परपस्परांच्या मतदारसंघात एकमेकांना राेखण्याचा प्रयत्न केला. याचाही फटका थाेरात यांना बसला. नेवाशात माजी मंत्री शंकरराव गडाख यांना शिवसेना शिंदे गटाचे विठ्ठल लंघे यांनी चितपट केले. हा पराभव ठाकरे गटासाठी धक्कादायक आहे.