लाखो मतदार बजावणार मतदानाचा हक्क
Maharashtra Vidhansabha Nivadnuk : मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान घेतले जाणार आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील 9 कोटींहून अधिक मतदार आज आपल्या मतदानाचा वापर करुन नवीन सरकार निवडतील. सर्व मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन सर्व राजकीय पक्षांनीही केले आहे.
येत्या 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी 6 मोठे पक्ष दोन आघाड्यांचा भाग म्हणून निवडणूक लढवत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा- शिवसेनेची युती झाली होती. तेव्हा भाजपाने १०५, तर शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला ४४, तर राष्ट्रवादीला ५४ जागा मिळाल्या होत्या.
महायुती आणि महाविकास आघाडीत प्रामुख्याने लढत
महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. या निवडणुकीत विविध पक्षांच्या अनेक बंडखोरांनी देखील आपले नशिब आजमावले आहे. या बंडोबांचे बंड रोखण्यात त्या-त्या पक्षांना काही ठिकाणी अपयश आल्याने काही ठिकाणी तिरंगी लढत देखील होत आहेत. असे असले तरी महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचे उमेदवार यांच्यातच या निवडणुकीत थेट लढत आहेत.
2201 पैकी फक्त 204 महिला
सुमारे ३१% म्हणजेच ६८६, उमेदवारांनी त्यांचे वय २५ ते ४० वर्षांच्या दरम्यान घोषित केले आहे. ३१७ (१४%) ६१ ते ८० वयोगटातील आहेत, तर २ उमेदवार ८० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. या २२०१ पैकी फक्त २०४ महिला उमेदवार आहेत, जे सुमारे ९% आहे. ४७% लोकांनी स्वतःला ५वी ते १२ वीदरम्यान असल्याचे घोषित केले आहे.
३८ टक्के उमेदवार कोट्यधीश
829 म्हणजेच ३८ टक्के उमेदवार कोट्यधीश असल्याची माहिती दिली जात आहे. गेल्या निवडणुकीत हा आकडा ३२% होता. त्यांच्याकडे सरासरी ९.११ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर भाजपा उमेदवारांची सरासरी मालमत्ता ५४ कोटी रुपये आहे.
१५ विधानसभा, नांदेड पोटनिवडणुकीचे मतदान
बुधवारी महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व २८८ जागांवर आणि झारखंडमधील दुसऱ्या टप्प्यातील ३८ जागांवर तसेच ४ राज्यांतील १५ विधानसभेच्या जागा आणि महाराष्ट्रातील नांदेड लोकसभेच्या जागेवर बुधवारी पोटनिवडणूक होणार आहे.