मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृतीबद्दल चिंताजनक विधान (फोटो - सोशल मीडिया)
जालना : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आला असून अवघे काही तास प्रचारासाठी बाकी आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी प्रामुख्याने लढत आहे. तसेच मराठा समाजाचे मतदान देखील निर्णायक ठरणार आहे. आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मराठा समाजाशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे.
मागील दीड वर्षांपासून राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार उपोषण व आंदोलनं केली. यामुळे अनेकदा त्यांची प्रकृती खालवली देखील होती. मनोज जरांगे पाटील यांना अनेकदा रुग्णालयामध्ये दाखल देखील करावे लागले होते. मात्र त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ऐनवेळेला त्यांनी आपला निर्णय मागे घेत निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता जरांगे पाटील यांनी आपल्या प्रकृतीबद्दल सांगताना मी आता थोड्याच दिवसांचा पाहुणा” हे विधान केले. यामुले मराठा समाजाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
अमित शहांचा महाराष्ट्र दौरा रद्द, तातडीने दिल्लीकडे रवाना; मोठं कारण आलं समोर
मनोज जरांगे पाटील यांनी लालसगाव येथे मराठा समाजाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या प्रकृतीची महिती दिली. मात्र ही देताना त्यांच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा नाराजीचा सूर दिसून आला. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मी तुमचा थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे. माझं शरीर मला साथ देत नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहू नये, माझा समाज आरक्षणापासून लांब राहू नये, अशी माझी इच्छा आहे”, असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “मला दर 8-15 दिवसांनी सलाईन लावावी लागते. मी तुम्हाला आधीपासूनच सांगतोय. कारण हे शरीर आहे. कधी जाईल माहिती नाही. मी तुमच्यात किती दिवस राहीन हे मलाही सांगता येत नाही. माझं शरीर कधी धोका देईल सांगता येत नाही. मी उपोषणं केली आहेत. त्या उपोषणांमुळे मला चालताना, उतरताना-चढतानाही त्रास होतो”, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी भाष्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या विधानामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत तर्क-वितर्क केले जाऊ लागले आहेत.