अमित शहांचा महाराष्ट्र दौरा रद्द, तातडीने दिल्लीकडे रवाना
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असून आज अमित शहांच्या नागपूरमध्ये ४ सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी शनिवारी रात्री ते नागपूरमध्ये दाखल झाले होते. मात्र अमित शहांचा राज्यातील दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. ते तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहेत. मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला आहे, त्यावर चर्चा करण्याठी ते दिल्ली गेल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान स्मृती इराणी, शिवराजसिंह चौहान आणि भाजपच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत या सभा पार पाडणार आहेत.
निवडणुकीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा भडका उडाला असून राज्यात तणावपूर्ण स्थिती आहे. इम्फाल खोऱ्यात भाजपच्या तीन आमदारांची घरं जाळण्यात आली आहेत, ज्यात एका मंत्र्याचाही समावेश आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरही हल्ला होण्याची शक्यता होती, मात्र सुरक्षा दलांनी हा हल्ला रोखण्यात यळ मिळलं आहे. त्यामुळे मणिपूरमधील स्थितीचा स्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित शहा एक बैठक घेण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या सुरक्षा अधिकारींची एक टीम लवकरच मणिपूरला पाठवली जाणार असून राज्य सरकारला परिस्थिती हाताळण्यात मदत करणार आहे. शनिवारी रात्री पुन्हा काही घटना घडल्या होत्या. जिरिबाम जिल्ह्यातील तीन महिला आणि मुलांची हत्या केल्याच्या निषेधार्थ लोकांनी मणिपूरच्या इम्फाल व्हॅलीतील पाच जिल्ह्यांमध्ये हल्ले केले. यानंतर कर्फ्यू लावण्यात आला आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
अमित शहा यांच्यासंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरू असून येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे अमित शहा महाराष्ट्रातील प्रचारात व्यस्त होते. नागपूरमध्ये आज त्यांच्या चार सभा होणार होत्या, त्यासाठी ते रात्रीच नागपूरमध्ये दाखल झाले होते. मात्र शनिवारी रात्रीच मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या, त्यामुळे अमित शहांनी आपला नियोजित दौरा रद्द केला आणि दिल्लीकडे रवाना झाले. त्याच्या सभांचं नेतृत्व आता स्मृती इराणी, शिवराजसिंह चौहान आणि भाजपचे इतर नेते करणार आहेत.