फोटो सौजन्य - Social Media
रुग्णांचे प्राण वाचवणारे डॉक्टर स्वतः मात्र आजारांच्या विळख्यात अडकत चालल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता, प्रचंड कामाचा ताण, लांब ड्युटी तास आणि मानसिक दबाव यामुळे मोठ्या संख्येने डॉक्टर लाइफस्टाइलशी संबंधित गंभीर आजारांना बळी पडत असल्याचे एका नव्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. ही माहिती ‘जर्नल ऑफ मिड-लाईफ हेल्थ’मध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासात समोर आली आहे. या अभ्यासासाठी दिल्लीसह देशातील सात राज्यांमधील २६५ डॉक्टरांचा समावेश करण्यात आला होता. २०२५ मध्ये तब्बल चार महिने चाललेल्या या ऑनलाईन अभ्यासात डॉक्टरांचे आरोग्य, जीवनशैली, सवयी आणि कामाचे स्वरूप यांचा सखोल अभ्यास करण्यात आला. या संशोधनाचे नेतृत्व एस.एन. मेडिकल कॉलेज, आग्रा येथील मेडिसिन विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रभात अग्रवाल यांनी केले. कोलकाता आणि झारखंडमधील वैद्यकीय व संशोधन संस्थांनीही या अभ्यासात सहकार्य केले.
अभ्यासातील निष्कर्ष अत्यंत चिंताजनक आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या डॉक्टरांपैकी तब्बल ४८ टक्के डॉक्टर उच्च रक्तदाबाने (हाय ब्लड प्रेशर) त्रस्त असल्याचे आढळले. तर २३ टक्के डॉक्टर मधुमेहाचे (डायबिटीज) रुग्ण आहेत. याशिवाय १४ टक्के डॉक्टरांमध्ये उच्च कोलेस्टेरॉल, थायरॉईड आणि हृदयविकारासारख्या गंभीर समस्या आढळून आल्या. काही डॉक्टर लठ्ठपणाच्या समस्येशीही झुंज देत असल्याचे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर काही डॉक्टरांमध्ये धूम्रपानासारख्या अपायकारक सवयीही आढळून आल्या आहेत. सततचा ताण आणि मानसिक थकवा यामुळे अनेक डॉक्टर अशा सवयींकडे वळत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. संशोधकांच्या मते, डॉक्टरांनी स्वतःसाठी नियमित आरोग्य तपासणी, योग्य वर्क-लाईफ बॅलन्स, मानसिक आरोग्य समर्थन आणि संस्थात्मक पातळीवर ठोस वेलनेस गाईडलाइन्स असणे अत्यावश्यक आहे.
या आजारांमागची कारणेही अभ्यासात स्पष्ट करण्यात आली आहेत. दीर्घकाळ चालणाऱ्या ड्युटी, सलग नाईट शिफ्ट, प्रचंड मानसिक ताण, अपुरी झोप आणि अनियमित आहार या सगळ्या गोष्टी डॉक्टरांच्या बिघडलेल्या आरोग्यास कारणीभूत ठरत आहेत. अनेक वेळा डॉक्टरांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नाही, ही वस्तुस्थिती अभ्यासातून पुढे आली आहे. दिल्लीच्या संदर्भात हा अभ्यास विशेष महत्त्वाचा ठरतो. राजधानीतील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील डॉक्टरांवर कामाचा ताण अत्यंत जास्त आहे. अभ्यासात दिल्लीतील कोणत्याही विशिष्ट रुग्णालयाचे नाव जाहीर करण्यात आले नसले, तरी राजधानीतील विविध स्तरांवरील डॉक्टर या संशोधनात सहभागी होते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर, नुकताच दिल्लीतील नामांकित जी.बी. पंत रुग्णालयाच्या हृदयरोग विभागातील एका सीनियर रेसिडेंट डॉक्टरने सलग ७२ तासांची ड्युटी लावण्यात आल्याने त्रस्त होऊन राजीनामा दिल्याची घटना घडली होती. या घटनेने देशभरातील आरोग्य व्यवस्थेतील डॉक्टरांवरील ताण पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डॉक्टर निरोगी असतील, तरच समाज निरोगी राहू शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देणे ही केवळ वैयक्तिक नव्हे, तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी असल्याचे या अभ्यासातून अधोरेखित झाले आहे.






