प्रसाद भोईर मविआचे अधिकृत उमेदवार, पेण विधानसभेवर भगवा फडकणारच - विजय कदम
191 पेण विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रसाद भोईर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून 191 पेण विधानसभा मतदारसंघात प्रसाद भोईर हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व इतर घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबतच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक त्यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत, असं वक्तव्य शिवसेना उपनेते विजय कदम यांनी केलं आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेदेखील वाचा- भाजपची मोठी कारवाई, 37 जागांवर बंडखोरी करणाऱ्या 40 बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी
शिवसेना उपनेते विजय कदम म्हणाले की, प्रसाद भोईर हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे यंदा पेण विधानसभेवर भगवा फडकणारच. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांना अलिबाग विधानसभेची उमेदवारी पक्षाने दिले असताना देखील केवळ घटक पक्षाचे सहकारी जयंत पाटील यांचा मान म्हणून पक्षप्रमुखांनी सुरेंद्र म्हात्रे यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला. त्यामुळे आम्ही आघाडी धर्म पाळला आहे. तसाच आघाडी धर्म इतर घटक पक्षांनी पाळावा.
पेण विधानसभा निवडणुकीत मशाल चिन्हावर लढण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे आम्ही कामाला लागलो आहोत आणि यंदा पेण विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकणारच.” असा विश्वास शिवसेना उपनेते विजय कदम यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना व्यक्त केला.
191 पेण विधानसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाकडून अतुल म्हात्रे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रसाद भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पेण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा सुरू झाली होती. अधिकृत उमेदवार कोण असा संभ्रम निर्माण झाला होता. तो संभ्रम दूर करण्यासाठी शिवसेनेतर्फे उपनेते विजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद घेण्यात आली होती.
हेदेखील वाचा- भोर मतदारसंघात तिरंगी नव्हे तर थेट चौरंगी लढत होणार; नक्की कोण होणार आमदार? जनतेला उत्सुकता
या पत्रकार परिषदेला शिवसेना उपनेते विजय कदम, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, तालुकाप्रमुख जगदीश ठाकुर,जिल्हा समन्वयक नरेश गावंड, उमेदवार प्रसाद भोईर, विधानसभा सहसमन्वयक समिर म्हात्रे, संघटक लहू पाटील, तालुका सह संपर्कप्रमुख भगवान पाटील, जिते विभाग प्रमुख राजू पाटील, चंद्रहास म्हात्रे, योगेश पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसाद भोईरच 191 पेण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असून ते शिवसेनेच्या मशाल चिन्हावर लढत आहेत. त्यांना शिवसेना व घटक पक्षांचा पूर्ण पाठिंबा आहे. तरी कोणीही संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करू नये. असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी यावेळी केले.
पेण शहरासह विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्याचे आमचे व्हिजन आहे. पेण खारेपाटातील पाणी प्रश्न, रोजगार, पेण मधील वाहतूक कोंडी व पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा करणार तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची ग्वाही उमेदवार प्रसाद भोईर यांनी यावेळी दिली.