File Photo : Chavan-Patil
पुणे / संदीप पाटील : पश्चिम महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व महायुतीत चुरशीच्या लढती होत आहेत. यातील कराड दक्षिण व कराड उत्तरेतील लढतीकडे राज्याचे लक्ष वेधले आहे. दक्षिणेत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, तर उत्तरेत माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांना घेरण्याची रणनीती भाजपने आखली आहे. विरोधकांचे आव्हान रोखण्यासाठी ‘दक्षिण-उत्तरे’त अलिखित ‘तह’ होण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा : प्रचारसभांमधील घोषणांवरुन रंगलं राजकारण! योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर अजित पवारांचे प्रत्युत्तर
पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी व महायुतीत वर्चस्वाची लढाई सुरु आहे. विधानसभेच्या एका एका जागेसाठी सत्ताधारी व विरोधकांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीतील डॅमेज कंट्रोल विधानसभा निवडणुकीत भरुन काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. विरोधकांच्या ताब्यातील जागा हिसकावून घेणे हा प्रयत्नांचा एक भाग राहणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे बडे मोहरे भाजपच्या निशाण्यावर आहेत. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील भाजपचे विशेष लक्ष्य आहेत. आमदार चव्हाण व आमदार पाटील महाविकास आघाडीचे महत्वाचे चेहरे आहेत. त्यांना मतदारसंघात जखडून ठेवण्याची भाजपची खेळी आहे.
दोन्ही मतदारसंघात पक्षाने ताकद पणाला लावली आहे. दक्षिणेत काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचे पुत्र डॉ. अतुल भोसले यांना, तर उत्तरेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात मनोज घोरपडे यांना भाजपने रिंगणात उतरविले आहे.
भोसले ‘दक्षिणे’वर स्वारी करणार का?
भोसले यांचा चव्हाण यांच्याशी तिसऱ्यांदा, तर घोरपडे यांचा पाटील यांच्याशी दुसऱ्यांदा सामना होत आहे. भोसले साखर कारखानदारीतील बडे प्रस्थ आहे. कृष्णा उद्योग समूहातील विविध संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. दिमतीला कार्यकर्त्यांचा लवाजमा व ‘अर्थ’पूर्ण शक्ती आहे. या पाठबळावर चव्हाण यांना नामोहरम करण्याचा चंग भोसले यांनी बांधला आहे. भाजपची कवचकुंडले परिधान करून चव्हाण यांची वाट बिकट करण्याचा भोसले यांचा मनसुबा आहे. दोनदा जंग जंग पछाडूनही भोसले यांना ‘दक्षिणे’वर स्वारी करता आली नाही. येणाऱ्या निवडणुकीत भोसले यशस्वी होणार का? याची उत्सुकता आहे.
उत्तरेत भाजप विजयापर्यंत पाेहचणार का?
उत्तरेत बाळासाहेब पाटील यांना शह देण्यासाठी भाजपची टीम ‘शत-प्रतिशत’ कामाला लागली आहे. गतवेळी अपक्ष लढलेल्या मनोज घोरपडे यांच्या हातात कमळ देत भाजपने परिवर्तनाची हाक दिली आहे. उत्तरेतून लढण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ इच्छुक होते. मात्र भाजपच्या धुरिणांनी घोरपडे यांना पसंती दिली. खासदार उदयनराजे भोसले यांनी घोरपडे यांच्या पारड्यात वजन टाकल्याने कदम यांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागली. भाजपची एकवटलेली ताकद घोरपडे यांना विजयापर्यंत घेऊन जाणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
उदयसिंहांची भूमिका ठरणार निर्णायक
कराड दक्षिणेत पृथ्वीराज चव्हाण, स्वर्गीय आमदार विलासराव पाटील (उंडाळकर), अतुल भोसले यांचा गट कार्यरत आहे. तर कराड उत्तरेत आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, स्वर्गीय आमदार विलासराव पाटील (उंडाळकर) यांच्या कार्यकर्त्यांची फळी आहे. उत्तरेत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची आमदार बाळासाहेब पाटील यांना, तर कराड शहरातून बाळासाहेब पाटील यांची पृथ्वीराज चव्हाण यांना मदत होऊ शकते. बदलत्या समीकरणात उंडाळकर गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. गतवेळी अॅड. उदयसिंह पाटील (उंडाळकर) यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना अप्रत्यक्ष हात दिला होता. आता चव्हाण व उंडाळकर हातात हात घालून काम करीत आहेत. ‘दक्षिणे’त ऍड. पाटील यांचा चव्हाण यांना हात मिळणार आहे, मात्र ‘उत्तरे’त त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे.