अजित पवार यांची योगी आदित्यनाथ यांच्या टीकेवर प्रत्युत्तर (फोटो - सोशल मीडिया)
बारामती : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यामध्ये मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. बंडखोरीनंतर ही पहिली विधानसभा निवडणूक असल्यामुळे प्रतिष्ठेची बनली आहे. मतदानासाठी अवघा एक आठवडा प्रचारासाठी शिल्लक राहिला असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. राष्ट्रीय पक्षाचे दिल्लीतील नेते राज्यामध्ये ठाण मांडून बसले आहे. आज महाराष्ट्रामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे प्रचारसभा घेणार आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली. त्यांनी भाषणामध्ये केलेल्या घोषणांवर अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री प्रचारासाठी आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील प्रचारसभा घेतल्या आहेत. वाशिममध्ये झालेल्या प्रचारसभेमध्ये योगी आदित्यनाथ यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. महाविकास आघाडी ही महाअडाणी असल्याचे देखील ते म्हणाले होते. त्याचबरोबर ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा योगी आदित्यनाथ यांनी दिला होता. त्यांच्या या नाऱ्यावरुन आता राजकारण रंगले आहे. महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेला उत्तर दिले आहे.
हे देखील वाचा : “फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे मालक”, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल
अजित पवार यांनी योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेवर उत्तर दिले. त्याचबरोबर योगी आदित्यनाथ यांचे नाव घेणे देखील टाळले. अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्राची तुलना इतर राज्यांशी करणे चुकीचे ठरेल. महाराष्ट्रातील लोकांनी आजवर पुरोगामीपण जपलेले आहे. बाहेरच्या राज्यातील नेत्यांनी इथे येऊन वेगळी विधाने करू नयेत. महाराष्ट्र हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना माननारा आहे. बाहेरच्या राज्यातील नेते जे विचार मांडत आहेत, ते विचार महाराष्ट्राने कधीच मान्य केलेले नाहीत.”असे विधान अजित पवार यांनी केले. त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षरित्या योगी आदित्यनाथ यांना टोला लगावला. त्यामुळे महायुतीमध्ये प्रचारावरुन आणि त्यातील घोषणाबाजीवरुन रस्सीखेच सुरु आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेला भाजपच्या महाराष्ट्राच्या नेत्यांनी अक्षऱशः डोक्यावर घेतले आहे. भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेला प्रसिद्धी दिली आहे. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट देखील केली आहे. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये प्रचारावरुन मतभेद सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. आता राज्यामध्ये अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील प्रचार सभा घेणार आहेत. मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही योगी आदित्यनाथ यांच्या नाऱ्यात काहीच चुकीचे नसल्याचे सांगितले आहे. तर अजित पवार यांनी मुस्लीम उमेदवार दिले आहेत.