देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही माझी...; एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगून टाकलं
शिर्डी : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. निकाल हाती आला असून महायुती सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असताना एकतर्फी निकाल लागल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विरोधी पक्षनेता म्हणून देखील विरोधकांना दावा करता येणार नाहीये. विरोधकांनी ईव्हीएम मशीनमध्ये फ्रॉड केला असल्याचा दावा केला आहे. यावरुन आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे.
शिंदे गटाचे नेते रामदास कदम हे शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. परिवारासोबत दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रामदास कदम म्हणाले की, “साईबाबांनी महायुतीला मोठा कौल दिला आहे. दोन दिवसांत महायुतीचे सरकार बनेल. महाराष्ट्रातील जनतेने 18 ते 20 तास महाराष्ट्रात काम करणारा मुख्यमंत्री पाहिला. ते व्यक्तीमत्व म्हणजेच एकनाथ शिंदे आहे. मागच्या वेळी आमचा आकडा कमी असताना आम्हाला भाजपच्या वरिष्ठांनी संधी दिली. आता भाजपचे 133 हून अधिक आमदार स्वतःचे आहे. त्यामुळे आम्ही किती मागावे? काय मागावे? याचे भान ठेवलं पाहिजे,” असे मत रामदास कदम यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला आहे. तर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार हे स्पष्ट झाले आहे. यावर रामदास कदम पुढे म्हणाले की, “आम्हा सर्वांचीच इच्छा की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. परंतु भाजपला देखील त्यांचा पक्ष चालवायचा आहे. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. महायुतीमध्ये कुठलाही मतभेद नाहीत,” असे मत रामदास कदम यांनी व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीमध्ये लागलेल्या धक्कादायक निकालामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय घेतला जात आहे. त्याबद्दल बोलताना रामदास कदम म्हणाले, “लोकसभेत त्यांना जास्त जागा मिळाल्या. जास्त खासदार निवडून आले. तेव्हा त्यांनी ईव्हीएम मशिनवर कुठे खापर फोडले का? नाही ना. मग आता विधानसभेत महायुतीच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे त्यांना कारण हवे आहे. बाजूने निकाल लागला की मशीन चांगले आणि विरोधात निकाल लागला की मशीन वाईट, असा कसा तुमचा निकष आहे,” असा प्रश्न रामदास कदम यांनी विचारला.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
दिल्लीमध्ये होणार मुख्यमंत्रिपदाचा निर्णय
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दिल्लीमध्ये होणार आहे. निवडणुकीच्या पूर्वी झालेल्या चर्चांमध्ये देखील भाजप पक्षश्रेष्ठी यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याप्रमाणे आता सत्ता स्थापन करताना देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार व एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची रात्री बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्राचा पुढील पाच वर्षांचा कारभारी ठरवण्यात येणार आहे.