श्रीकांत शिंदे यांची एकनाथ शिंदे यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे (फोटो - सोशल मीडिया)
ठाणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राजकारण रंगले आहे. यंदाची निवडणूक ही अटीतटीची होणार असल्याचा अंदाज होता. मात्र महायुतीट्या बाजूने एकतर्फी निकाल लागल्यामुळे विरोधकांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच ईव्हीएम मशीनवर संशय घेतला. मात्र अद्याप महायुतीने सरकार स्थापनेवर दावा केलेला नाही. राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार याची दिल्लीमध्ये चर्चा होणार आहे. त्यापूर्वी श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे वडील काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी खास पत्र लिहून भावना व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. मुख्यमंत्री भाजपचा होणार हे आता स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे. तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरुन दावा सोडला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याची घोषणा केली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण एकनाथ शिंदे यांनी केलेल्या त्यागासाठी खास अशी पोस्ट लिहिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
काय आहे श्रीकांत शिंदे यांची पोस्ट?
सोशल मीडियावर पोस्ट करुन खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपले वडील काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी भावना व्यक्त केल्या आहेत. श्रीकांत शिंदे लिहिले आहे की, मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे. सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर – गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. खूप अभिमान वाटतो बाबा! अशा भावना श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.
मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा…
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) November 27, 2024
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, राज्यात मिळालेला हा सर्वात मोठा विजय आहे. मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ताच राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. अडीच वर्षांच्या कार्यकाळात मी खूप समाधानी आहे. म्ही नाराज होऊन रडणारे नाही तर लढणारे आहोत. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्रसाठी काम करेन. मी काहीही ताणून ठेवलेले नाही. मी काल पंतप्रधान मोदी यांना फोन केला होता. त्यांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम आहे. सत्तास्थापनेसाठी आमच्याकडून कोणतीही अडचण होणार नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपश्रेष्ठी निर्णय घेतील त्याला आमचे समर्थन असेल, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला.