महाराष्ट्राच्या शपथविधी सोहळ्याबाबत व मुख्यमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीचे छगन भुजबळ बोलले (फोटो - सोशल मीडिया)
नाशिक : राज्यामध्ये राजकारणाला उधाण आले आहे. अगदी दिल्लीपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महायुतीला राज्यामध्ये बहुमतापेक्षाही अधिक जागा मिळाल्या आहेत. एकतर्फी विजय मिळाल्यानंतर देखील सत्तास्थापनचा दावा करण्यात आला नव्हता. यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. या राजकीय घडामोडींवर अजित पवार गटाचे नेते व आमदार छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधून मत व्यक्त केले आहे.
नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भुजबळ यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. शपथविधी व सत्तास्थापनेला वेळ लागत असल्याचे विरोधकांकडून म्हटले जात आहे. यावर भुजबळ म्हणाले की, “ज्या वेळेस तीन पक्ष एकत्रित येत असतात त्यावेळी सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो. काही वेळेस महिना महिना देखील लागला आहे, त्या मनाने हा वेळ काहीच नाही. येत्या दोन ते चार दिवसांत शपथ विधीचा कार्यक्रम उरकला जाईल. आज तिन्ही नेते दिल्लीला जाऊन ते ठरवणार आहेत काय फॉर्म्युला असणार. भाजपचे 132 आमदार झाले आहेत, त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणार हे स्वाभाविक आहे. एकनाथ शिंदे हे त्यांचा निर्णय घेतील,” असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भाजपचा मुख्यमंत्री होणं हे स्वाभाविक
पुढे राज्यामध्ये मुख्यमंत्री व इतर मंत्रिपदं देताना जातीय समीकरणाची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे. यावर भुजबळ म्हणाले की,”असे काहीही होणार नाही. 132 आमदार निवडून आल्या नंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. यावर आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तेव्हा फडणवीस म्हणाले मी बाहेर राहून काम करेल. मात्र पक्षाने त्यांना दिल्लीवरून सांगितलं तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हावं लागेल. तेव्हा ती एक प्रकारची अवहेलना सहन करून ते उपमुख्यमंत्री झाले. पूर्णपणे त्यांनी त्यांच्या कामाला झोकवून दिलं,” असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त करुन अडीच वर्षापूर्वी झालेल्या सत्तास्थापनेच्या प्रक्रियेची आठवण करुन दिली.
फडणवीसांना टार्गेट केलं जातंय
महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. मात्र जातीय समीकरणामुळे त्यांना डावलण्याची शक्यता अनेकजण करत आहेत. यावर छगन भुजबळ म्हणाले की, “राज्यामध्ये महायुतीला पूर्ण बहुमत मिळून देण्याचं काम फडणवीस यांनी केलं आहे. किंबहुना सर्व मागास वर्गीय आणि ओबीसी यांच्या अधिकारांवर कुठे गदा येऊ नये यासाठी फडणवीस यांनी सहकार्य आणि मदत केली आहे. म्हणून त्यांना काही लोक प्रचंड टार्गेट करत आहेत. कारण त्यांनी ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ नये यासाठी काम केलं,” असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
तसेच यंदाचा विधानसभेचा निकाल अतिशय अनपेक्षित असा लागला. यामुळे महाविकास आघाडीकडून EVM मशीनवर संशय व्यक्त करण्यात येत होता. यावरुन छगन भुजबळ यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. भुजबळ म्हणाले की, “हे लोक मशीन वर डाऊट घेतात. पण 2019 साली निवडणुकीमध्ये मला 56 हजारांचा लीड होता. मनोज जरांगे माझ्या मतदारसंघात रात्री 2 वाजे पर्यंत फिरत होते. माझे मतदान 2 लाखांपर्यंत जायला पाहिजेल होतं. जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला, आणि एका मोठ्या वर्गाचेमला मत मिळाले नाहीत. EVM मध्ये गडबड आहे तर मला सुद्धा आणखी 1 लाख मत मिळायला हवी होती. माझी मत का कमी झाली मग? लोकसभेला बरोबर, आता चूक आहे. कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडव लागत. EVM निर्जीव वस्तू आहे, त्याच्यावर खापरं फोडण सोपं आहे,” असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे.