सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीला पूर्ण ताकदीने सामोरे जायचे आहे. त्यासाठी ३२ प्रभागातील १२८ जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करावी, अशा स्पष्ट सूचना शिवसेनेचे उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसैनिकांना दिल्या आहेत. तसेच युतीबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. जो निर्णय होईल, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने शिवसेनेचा शनिवारी (१५ नोव्हेंबर) पिंपरीत पदाधिकारी प्रशिक्षण मेळावा पार पडला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, भाजप आणि शिवसेनेची नैसर्गिक युती आहे. महापालिका निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. भाजपसोबत युतीला प्राधान्य आहे. शिवसेना पूर्ण ताकदीनिशी महापालिका निवडणुकीत उतरणार आहे. शिवसेनेने १२८ जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसैनिकांनी गाफील राहू नये. मतदारयाद्याकडे लक्ष द्यावे. प्रभागाचा बारकाईने अभ्यास करावा. सूक्ष्म नियोजन करून कामाला लागावे. महापालिका सभागृहात शिवसेनेचे संख्याबळ वाढवायचे आहे. त्यादृष्टीने कामाला सुरुवात करावी.
उपनेत्या सुलभा उबाळे म्हणाल्या, शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेतून महिलांना आर्थिक मदत मिळत आहे. महिला मोठ्या संख्येने शिवसेनेसोबत जोडल्या आहेत. शिंदे मुख्यमंत्री असताना आणलेल्या लोकोपयोगी योजना आणि महायुती सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. लोकांना लाभ मिळवून द्यावा.
इरफान सय्यद म्हणाले, शहरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली आहे. शिवसेनेने घरोघरी जाऊन सभासद नोंदणी केली आहे. सभासद नोंदणीस चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे शिवसेनेबाबत सकारात्मक वातावरण आहे. शिवसेनेत दररोज पक्ष प्रवेश होत आहेत. याचा आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला फायदा होईल.
विश्वजीत बारणे म्हणाले, युवासेनेची चांगली बांधणी झाली आहे. त्यामुळे युवा सेनेच्या जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांना निवडणूक लढविण्याची संधी देण्याबाबत पक्ष नेतृत्वाकडे आग्रह राहील. उमेदवारांनी जनसंपर्क वाढविण्यावर भर द्यावा. लोकांपर्यंत पोहोचावे. गाफील न राहता निवडणुकीच्या तयारीला लागावे.






