शरद पवार गटाच्यानेते सुनील वऱ्हाडे लाखोंची मागणी केल्याचा यशोमती ठाकूर यांचा आरोप (फोटो - सोशल मीडिया)
अमरावती : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकारण रंगले आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आली असून नेत्यांमध्ये वांदग निर्माण झाला आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यंदाची विधानसभा निवडणुक ही प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये होत आहे. मात्र आता महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ पसरली आहे. अमरावतीच्या कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकुर यांनी राष्ट्रवादी शऱद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील वऱ्हाडे यांच्यावर कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी गंभीर आरोप केले आहेत. पैसे देऊन ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या, “यापूर्वी झालेल्या बँकेच्या निवडणुकीत आम्ही त्यांना निवडून आणले, त्यांनी पैशांची मदत मागितली ती सुद्धा केली होती. आता काल-परवा त्यांनी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि 25 लाख रुपयांची मागणी केली. ते व्यापारी प्रवृत्तीचे असल्याने सदैव ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असतात.” असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कॉंग्रेस महिला नेत्या यशोमती ठाकूर यांनी शरद पवार गटाच्या नेत्यावर असे आरोप केल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. यामुळे महाविकास आघाडीमध्ये सारं काही अलबेल नसल्याचे दिसून आले आहे. ब्लॅकमेल केल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. तर सुनील वऱ्हाडे यांनी आरोप फेटाळून लावले आहे.
राष्ट्रवादीचे नेते सुनील वऱ्हाडे यांनी पलटवार करत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सुनील वऱ्हाडे म्हणाले, “मी माझ्या घरी बसलेलो आहे, पक्षाबरोबर कुठेच गडबड केली नसून, पक्षाशी निष्ठावंत आहे. आता त्यांनी चालवलेला हा चिल्लरपणा त्यांच्या फायद्याचा आहे की, तोट्याचा हे त्यांनीच ठरवायचे आहे.” असा घणाघात सुनील वऱ्हाडे यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
अमरावतीमधील तिवसा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यशोमती ठाकूर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. यशोमती ठाकूर यांनी 2019 मध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅटट्रीक केली. त्यांनी 11 हजार मतांची लीड मिळवली होती. यशोमती ठाकूर यांच्यासमोर यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून भाजपाचे राजेश वानखेडे यांचे आव्हान असणार आहे. यशोमती ठाकूर यांना भाजप कसा शह देणार याची चर्चा अमरावतीमध्ये सुरु आहे.