
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
जागतिक स्तरावर रहस्यपटांना नेहमीच प्रेक्षकांचे विशेष आकर्षण लाभले आहे. वास्तवाच्या पडद्यामागे दडलेल्या घटना आणि त्यातून उलगडणारी भावनिक गुंतागुंत हीच या प्रकारातील चित्रपटांची खरी ताकद ठरते. मराठी चित्रपटसृष्टीतही अशा रहस्यपटांनी कायमच आपला वेगळा ठसा उमटवला आहे.याच परंपरेला पुढे नेणारा ‘दृश्य-अदृश्य’ हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 56व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव (IFFI) मध्ये कौतुकाची थाप मिळालेल्या या चित्रपटाने आधीच उत्सुकता वाढवली आहे.
‘सुभेदार’, ‘शेर शिवराय’ आणि ‘सापळा’ या चित्रपटांमागील निर्मात्यांची दमदार टीम एकत्र येऊन तयार केलेल्या या रहस्यमय चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.‘दृश्य-अदृश्य’ 19 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, रहस्याचा पडदा मोठ्या पडद्यावर उलगडण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
निर्माते प्रद्योत पेंढारकर, अनिल वर्खडे, दत्ताजी थोरात, धनंजय थोरात, पृथ्वीराज खेडकर, युवराज खेडकर आणि अश्विनी खेडकर यांनी आरएसटी कॅनव्हास या बॅनरखाली ‘दृश्य-अदृश्य’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘कुरुक्षेत्र’, ‘बंदीशाळा’ , ‘एबी आणि सीडी’ या यशस्वी चित्रपटानंतर मिलिंद लेले यांनी ‘दृश्य-अदृश्य’चे दिग्दर्शन केले असून, कथा-पटकथा लेखनही केले आहे. अस्मिता कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे संवाद लेखन केले आहे.
‘दृश्य-अदृश्य’ चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच रोहितला 25 लाख रुपयांचे इन्सेन्टिव्ह मिळणार असल्याचे दाखवले जाते. मात्र हा इन्सेन्टिव्ह नेमका कशासाठी आहे, याचे गूढ त्याची पत्नी तन्वी हिलादेखील माहित नसते. त्याचदरम्यान रोहित आणि तन्वीची लहान मुलगी इशा अचानक हरवते आणि संपूर्ण कथा रहस्याच्या वळणावर येते.
इशाच्या शोधासाठी पोलिसांची एन्ट्री होते, पण परिस्थिती अधिकच गोंधळात टाकणारी ठरते. तन्वी हॉटेलमध्ये एकटीच आली असल्याचे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचे म्हणणे असते, तर दुसरीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने संशय अधिकच गडद होतो. प्रत्येकाच्या जबानीत तफावत दिसू लागते आणि तपासाची दिशा वारंवार बदलत राहते.
इशाचा शोध, पोलिसांचा तपास आणि या सगळ्या रहस्यात अडकलेली तन्वी, या सगळ्यामुळे चित्रपटातील गुंता अधिक वाढत जातो. त्यातच अचानक तन्वीच्या पती रोहितचा मृतदेह सापडतो आणि कथानक आणखीच थरारक वळण घेते.तन्वी जे सांगते ते खरंच घडलं आहे का? कोण खोटं बोलतंय? कोण कोणाला फसवतंय? इशा खरंच हरवली आहे की ही काही वेगळीच योजना आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न, रोहितची हत्या कोणी केली?भास आणि वास्तव यांच्या सीमारेषेवर उभा असलेला ‘दृश्य-अदृश्य’ हा चित्रपट प्रेक्षकांना सतत प्रश्नांच्या जाळ्यात अडकवतो. “जे दिसतं तेच खरं असतं का?” हा प्रश्न ट्रेलरच्या प्रत्येक फ्रेममध्ये जाणवतो आणि कथानकाची उत्सुकता शिगेला पोहोचवतो.
चित्रपटातील कलाकार मंडळी
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत लोकप्रिय झालेली अभिनेत्री पूजा सावंत या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ट्रेलरमधील तिच्या चेहऱ्यावरील भाव आणि तणावपूर्ण परिस्थिती प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवणारी ठरत आहे. पूजाने साकारलेली ‘तन्वी’ ही भूमिका तिच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि अधिक गुंतागुंतीची आहे.या चित्रपटात तिच्यासोबत अशोक समर्थ, सुव्रत जोशी, हार्दिक जोशी, अक्षया गुरव, विद्याधर जोशी, केया इंगळे यांसारखे मराठीतील आघाडीचे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे चित्रपटाची स्टारकास्टही तितकीच भक्कम असल्याचे दिसते.
Kamali Marathi Serial : कमळीच्या यशाने विजया बाबर भारवली; शेअर केल्या कॉलेजच्या आठवणी
तांत्रिक बाजूही तितकीच मजबूत असून डिओपी अमोल साळुंके यांनी सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सांभाळली आहे, तर संकलन सचिन वाघ यांनी केले आहे. रंगभूषा महेश बराटे यांनी तर वेशभूषा किर्ती जंगम-जोशी यांनी केली आहे.
गीतकार वलय मुळगुंद यांच्या गीतांना संगीतकार आशिष मुजुमदार आणि देवदत्त बाजी यांनी संगीतसाज चढवला आहे. या गाण्यांना गायिका प्रियांका बर्वे आणि निधी हेगडे यांचा आवाज लाभला असून कथानकाला अधिक प्रभावी बनवतो. गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन दीपक देबनाथ यांनी केले असून कला दिग्दर्शनाची जबाबदारी नितिन बोरकर यांनी सांभाळली आहे.एकूणच दमदार कलाकार, तांत्रिक टीम आणि रहस्यमय कथानक यामुळे ‘दृश्य-अदृश्य’बाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.