
Music Launch :'दिगंबरा दिगंबरा'च्या सुरांनी रंगली मैफल! अशोक सराफ यांची तबल्यावर साथ, राहुल देशपांडे यांचे सुरेल सादरीकरण
पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट ‘आदि अनंत’मधील ‘दिगंबरा दिगंबरा’ हे गाणं (Music Launch) प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने पुण्यात चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा उत्साहात पार पडला.
गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल सादरीकरणाला पद्मश्री अशोक सराफ यांनी तबल्याची साथ देत ठेका धरला. या खास संगीत मैफलीसोबतच कलाकारांसोबत मनमोकळ्या गप्पाही रंगल्या. या सोहळ्याला पद्मश्री अशोक सराफ, छायाचित्रकार, दिग्दर्शक महेश लिमये, संकर्षण कऱ्हाडे, सखी गोखले, निर्माते मुरलीधर छतवानी, समीर हंपी, अनिकेत मराठे, रविंद्र औटी आदी मान्यवर उपस्थित होते. नागरिकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दिगंबरा दिगंबरा’ या गाण्याला संगीत अविनाश-विश्वजीत यांनी दिलं असून गुरु ठाकूर यांनी गीतलेखन केलं आहे. तर राहुल देशपांडे यांच्या आवाजाने या गाण्यात आर्तता आणली आहे. महेश लिमये दिग्दर्शित ‘आदि अनंत’ हा नात्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि सहवासाचं महत्त्व सांगणारा चित्रपट आहे.
चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमधून अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यातील जिव्हाळ्याचं नातं समोर आलं होतं. या दोघांसोबत सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले आणि गुरु ठाकूर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. चित्रपटाच्या कथेतून उलगडणाऱ्या नात्यांच्या भावविश्वाला संगीताची साथ लाभली आहे.
संगीतकार अविनाश-विश्वजीत म्हणतात, ‘आदि अनंत’च्या संगीतावर काम करताना चित्रपटातील नात्यांमधल्या वेगवेगळ्या भावना सुरांतून मांडण्याचा प्रयत्न केला. ‘दिगंबरा दिगंबरा’ या गाण्याच्या माध्यमातूनही संगीत आणि शब्द यांचा सुंदर मेळ साधता आला.
दिग्दर्शक महेश लिमये म्हणतात, हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे. ‘आदि अनंत’मधील नाती ही आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत. कधी एखादा संवाद, कधी एखादी छोटी कृती, तर कधी फक्त सोबत असणंही नात्याची खोली सांगून जातं.
हीच सहजता आणि आपलेपणा चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटातील संगीतही या भावविश्वाचा महत्त्वाचा भाग आहे. संगीत अनावरण सोहळ्यात चित्रपटाचा विचार उपस्थितांपर्यंत पोहोचवता आला, याचा आनंद आहे.
Bandhu Marathi Movie: दोन भाऊ, दोन जोड्या अन् नात्यांची भावनिक गुंफण! ‘बंधू’ची कथा मनाला भिडणार
पॅनोरामा स्टुडिओज प्रस्तुत ‘आदि अनंत’ची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे यांनी केली आहे. रविंद्र औटी आणि दर्शन शाह सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांचे आहेत.
चित्रपटाच्या छायाचित्रण आणि दिग्दर्शनाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. येत्या 12 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे गाणे पॅनोरमा म्युझिकवर उपलब्ध आहे.
Ans: हा चित्रपट १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
Ans: पुण्यात झालेल्या सोहळ्यात राहुल देशपांडे यांनी गाण्याचे सुरेल सादरीकरण केले, तर पद्मश्री अशोक सराफ यांनी तबल्याची साथ दिली.
Ans: अशोक सराफ, संकर्षण कऱ्हाडे, सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले आणि गुरु ठाकूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.